...अन् मुंबई विमानतळावर जुळ्या भावांपुढे गडबडली ‘डीजीयात्रा’ची सिस्टिम; चेहऱ्यातील साधर्म्यामुळे प्रवेशास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:54 IST2026-01-06T12:54:46+5:302026-01-06T12:54:46+5:30
या जुळ्या बंधूंच्या चेहऱ्यात प्रचंड साधर्म्य असल्यामुळे विमान प्रवाशांना जलदगतीने विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या डीजीयात्रा या तंत्रज्ञानाने त्यांच्यापुढे अक्षरश: हात टेकले.

...अन् मुंबई विमानतळावर जुळ्या भावांपुढे गडबडली ‘डीजीयात्रा’ची सिस्टिम; चेहऱ्यातील साधर्म्यामुळे प्रवेशास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तंत्रज्ञान कितीही अत्याधुनिक झाले तरी निसर्गापुढे त्याला काही मर्यादा असल्याची प्रचिती मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या जुळ्या भावांना आली. या जुळ्या बंधूंच्या चेहऱ्यात प्रचंड साधर्म्य असल्यामुळे विमान प्रवाशांना जलदगतीने विमानतळावर सुविधा पुरवणाऱ्या डीजीयात्रा या तंत्रज्ञानाने त्यांच्यापुढे अक्षरश: हात टेकले. चेहऱ्यातील साधर्म्यामुळे या तंत्रज्ञानाने जुळ्या भावांना विमानतळावर प्रवेश नाकारला.
एक सारखे दोन चेहरे असल्याचे कारण देत त्यांना डीजीयात्राची सुविधा देण्यास तंत्रज्ञानाने नकार दिला. यामुळे या दोन्ही भावांना जुन्या व्यवस्थेनुसार प्रक्रिया पूर्ण करत पुढे जावे लागले. याचा फटका बसलेल्या प्रशांत मेनन यांनी यासंदर्भात एका व्हिडीओद्वारे आपली व्यथा मांडली.
‘जुडवा लोगों के लिये कुछ कीजिये’
मुंबई विमानतळावर शूटिंग करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करत माहिती दिली. ‘हम जुडवा लोगों के लिये कुछ कीजिये डिजीयात्रा’, असा संदेश लिहित हा व्हिडीओ प्रसारित केला. विमानतळावर प्रवेशापासून पुढे प्रवास सुकर व्हावा, यासाठी डीजीयात्रा प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
डीजीयात्रा प्रणालीच्या समोर आल्यानंतर त्याच्या टॅब्लेटमध्ये चेहऱ्याची ओळख पटवली जाते आणि त्यानंतर विमानतळावर पटकन प्रवेश करता येतो. अन्यथा विमानतळावर प्रवेश करण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत थांबावे लागते.
दिलगिरी अन् समस्या सोडवण्याचे आश्वासन
प्रशांत मेनन आपल्या जुळ्याभावासोबत विमानतळावर आल्यानंतर मात्र चेहरा साधर्म्यामुळे त्यांना तंत्रज्ञान प्रणालीने प्रवेश नाकारला. मेनन यांच्या पोस्टची डीजीयात्राने तातडीने दखल घेतली असून, दिलगिरी व्यक्त करतानाच तुमची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे उत्तर दिले.
साेशल मीडियावर व्हिडीओवर झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी रंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सीता आणि गीता यांच्यापुढेही आपली प्रणाली गंडू शकते, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. अशी वेळ येईल तेव्हा काय करायचे, याचा विचार या तंत्रज्ञान प्रणालीच्या निर्मात्यांनी केला नाही का, असा सवालही अनेकांनी उपस्थित करत काहींनी यंत्रणेवर संताप व्यक्त केला.