मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:16 IST2025-12-04T09:15:20+5:302025-12-04T09:16:46+5:30
यादी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम करण्यात येणार असून, मतदान केंद्रनिहाय यादी ही २२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.

मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
मुंबई : दुबार मतदारांचा घोळ अजूनही सुरूच आहे. महापालिकेच्या पहिल्याच प्रयोगात ‘ए’ विभागातील ४०० दुबार मतदारांचा शोध मतदार यादीतील छायाचित्रांच्या आधारे घेतला. त्यात केवळ १८ दुबार मतदार आढळून आले. त्यातील १८ दुबार मतदार हे ‘ए’ विभागातील होते तर इतर दोन अन्य विभागातील होते. उर्वरित सर्व केवळ नावाशी साधर्म्य होते, परंतु छायाचित्र वेगळी होती. त्यामुळे जे खऱ्या अर्थाने दुबार असतील त्यांच्या घरी जाऊन आता मतदार यादीतील छायाचित्रांच्या आधारे दुबार मतदारांचा शोध १० डिसेंबरपर्यंत घेतला जाणार आहे.
यादी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम करण्यात येणार असून, मतदान केंद्रनिहाय यादी ही २२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. दुबार मतदारांचा शोध घेण्याच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यादीतील छायाचित्रांच्या आधारे दुबार मतदारांचा शोध आधी विभागीय स्तरावर घेतला जाणार आहे. यासाठी एन विभागाने डेल तयार केले आहे. त्यानुसार ए विभागातील ४०० दुबार मतदारांचा अशा प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. इतर विभागीय कार्यालयांमध्ये याच पद्धतीचा अवलंब करून १० डिसेंबरनंतर जे छायाचित्र, नाव समान असेल अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांना कल्पना दिली जाणार आहे, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
मतदाराच्या मृत्यूचे पुरावे घ्या!
मतदाराचा मृत्यू झाल्यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अर्जदारांकडून मृत्यूबाबतचे पुरावे घ्यावेत. तसेच, महापालिकेकडे असलेल्या मृत्यूच्या नोंदीशी त्याची पडताळणी करावी, अशी सूचना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आज पालिकेत झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिली.
१२ डिसेंबरपूर्वी मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक शाखेकडे सादर करावी. पाडण्यात आलेल्या इमारतीत पूर्वी मतदान केंद्र असल्यास त्याच्या जागी पर्यायी मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे.
तसेच, गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांबाबत ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीची कामे करण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावी, असे आदेशही जोशी यांनी दिले आहेत.