‘त्या’ मोबाइल क्रमांकावरून लागला बेपत्ता बहिणींचा सुगावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:37 IST2026-03-12T13:36:23+5:302026-03-12T13:37:06+5:30
मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घरातून दोन सख्ख्या तरुण बहिणी बेपत्ता झाल्या हाेत्या. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय ...

‘त्या’ मोबाइल क्रमांकावरून लागला बेपत्ता बहिणींचा सुगावा
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घरातून दोन सख्ख्या तरुण बहिणी बेपत्ता झाल्या हाेत्या. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता त्यांच्या घरात मोबाइल क्रमांक आढळला अन् विठ्ठलवाडी पोलिसांनी त्या बहिणींचा शोध घेतला. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे भलतेच कारण समोर आले. सावत्र आई आणि सख्खा बाप त्यांना मारहाण करत असे. त्यांना शिक्षण घेऊ देत नाही, या कारणास्तव दोघी सख्ख्या बहिणींनी घरातून पलायन केले होते.
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या बहिणी बेपत्ता झाल्या. त्यांच्या आईवडिलांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्या दाेघींपैकी एकीचे अरबाज याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यानेच त्यांना बेपत्ता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. अरबाजची चौकशी केली असता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समजले. तपासादरम्यान पोलिसांना मुलींच्या राहत्या घरात एका ड्रेसवर मोबाइल क्रमांक लिहिलेला आढळला. त्या क्रमांकाचा शोध घेतला असता तो बंद होता. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना विकासचा मोबाइल क्रमांक मिळाला. तो क्रमांक बदलापूर परिसरात असल्याचे लोकेशनवरून स्पष्ट झाले.
तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता दोन्ही बहिणी अंबरनाथनजीक मित्राच्या घरात सुखरूप आढळून आल्या.
सावत्र आई, पित्याकडून शिक्षणात आडकाठी
बेपत्ता तरुणींना विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या बेपत्ता होण्याचे कारण विचारले असता त्या दोघींना तिची सावत्र आई आणि सख्खा बाप हे मारहाण करीत होते. त्यांना शिक्षण घेण्यास मज्जाव करीत होते. या दोघींना पुढे शिकायचे आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायचे आहे.
दोघींनी त्यांच्या आईवडिलांजवळ राहायचे नाही. सज्ञान असल्याने त्या कुठेही राहू शकतात. सुरुवातीला पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, आता त्या दोघींना सोडून दिल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.