खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:08 IST2025-01-17T12:08:07+5:302025-01-17T12:08:43+5:30
पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली, तरी विभाग प्रमुख मात्र हा मानवतेचा दृष्टिकोन असल्याचे सांगतात.

खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत
मुंबई : दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा कायदा असला तरी मुंबई महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच पदावर चिकटून बसलेले दिसतात. लेखा विभागातील नऊ कनिष्ठ आणि वरिष्ठ लेखापरीक्षक बिलिंग विभागातच कार्यरत आहेत. पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली, तरी विभाग प्रमुख मात्र हा मानवतेचा दृष्टिकोन असल्याचे सांगतात.
महापालिकेच्या लेखा विभागांतर्गत विविध विभाग आहेत. त्यात अर्थसंकल्प लेखा, महसूल, अंतर्गत लेखा विभाग आस्थापना, पीएफ, रोख, जीएसटी व आयकर विभाग आणि रजा पडताळणी, असे विभाग समाविष्ट आहेत. नियमानुसार लेखा विभागातील कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करून त्यांना याच विभागांतर्गत असलेल्या विविध विभागांमध्ये बदली करता येते.
ज्येष्ठता डावलून अधिकार? या विभागातील नुकत्याच निवृत्त झालेल्या एका माजी • उपायुक्तांच्या प्रभावाखाली हा विभाग अजूनही आहे. त्यामुळेच नऊ अधिकाऱ्यांची बदली बिलिंग या विभागातच केली जात असल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली. यातील एक कर्मचारी मुख्यालयात असलेल्या बिलिंग ३ विभागात काम करत असताना त्यांच्याकडे 'एन' विभागातील प्रकल्प देयकांची जबाबदारीही सोपवली आहे.
प्रथेनुसार जवळच्या प्रभागात काम करणाऱ्या व्यक्तीला ३ रिकाम्या जागेचा चार्ज दिला जातो, पण मुख्यालयातील कर्मचारी स्वतःचे काम सांभाळून घाटकोपर येथील काम पाहणार आहेत. या संदर्भात विभागाचे प्रमुख पांडुरंग गोसावी यांनी मात्र असे काहीही घडत नसल्याचे सांगितले.
୧ ठिकाणी बिलिंग विभाग
पालिकेचे विविध प्रकल्प किंवा विकासकामांच्या निविदांची बिले, कंत्राटदारांची देयके बिलिंग विभागामार्फत अदा करण्यात येतात. पालिका मुख्यालयासह मुंबई आणि उपनगरात २ ठिकाणी हे विभाग आहेत.
बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात येते. ते एकाच ठिकाणी आहेत, असे म्हणता येणार नाही. परंतु, काही अनुभवी लोक असतात, काही जणांना कौटुंबिक किंवा वैद्यकीय अडचणी असतात, अशा वेळेस मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार करावा लागतो. आता आम्ही यापुढे लवकरच लॉटरी काढून बदली करणार आहोत.
- पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल, मुंबई महापालिका