मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी -
फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या ३८ दिवसांच्या बाळाच्या अपहरणाने खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनराई पोलिसांनी रात्रंदिवस एक करत शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही आणि पोलिस सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी सुमारे ११ हजार रिक्षांची तपासणी करताच पोलिसांना पिवळे जॅकेट घातलेला एक आरोपी मुलाला रिक्षातून जाताना आढळून आला. पुढे जवळपास लाखभर मोबाइल क्रमांकाच्या पडताळणीतून टोळी मालवणीतील असल्याचे उघड झाले. सहा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी फिल्मी स्टाइलने चिमुकल्याची सुखरूप सुटका करत पुन्हा बाळाला आईच्या कुशीत दिले. अवघ्या पाच लाखांसाठी टोळीने या बाळाचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले. अशा वेगवेगळ्या टोळ्या मुंबईसह राज्यभरात आजही सक्रिय आहेत.
गोरेगाव पूर्व वनराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील बस डेपोजवळ २ मार्चच्या रात्री ३८ दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. आईवडील वसईहून चादरी विकण्यासाठी गोरेगाव परिसरात आले. रात्री ट्रेन चुकल्याने फुटपाथवरच झोपी गेले. त्याच दरम्यान टोळीने बाळाचे अपहरण करत पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी चौकडीला अटक केली. आरोपींनी फातिमा शेखला पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात मूल विकत घ्यायला सांगितले. शेखने रिक्षाचालक पतीच्या मदतीने या बाळाचे अपहरण केले होते.
आजही विशेषतः झोपडपट्टीत, फुटपाथवर राहणारे, गर्दुल्ले, गरीब, भिक्षेकरी यांची मुले या टोळीसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. यापूर्वीच्या कारवाईत या टोळीसह पैशांसाठी स्वतःच्या मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. अशा पालकांमुळे एखाद्या वस्तू प्रमाणे या कोवळ्या जिवांची खरेदी-विक्री होत असल्याचे वास्तव समोर आले, जे चक्रावून टाकणारे होते. धक्कादायक बाब म्हणजे चार भिंतीआड असलेल्या शहरासह खेडोपाड्यातील गृहिणीही अवघ्या ३० ते ५० हजार रुपयांच्या कमिशनसाठी एजंट बनत असल्याने यावरही नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणासमोर आहे.
यापूर्वी गुन्हे शाखेच्या कारवाईत गृहिणीच्या पेहराव्यामागे लपलेल्या वैशाली जैनच्या टोळीने शेकडो मुलांची खरेदी-विक्री केल्याचा संशय आहे. ट्रॉम्बे पोलिसांच्या कारवाईत अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टर व एजंटसह पाच महिलांच्या टोळीचा चेहरा समोर आला. याच प्रकरणात अटक करण्यात आलेली ज्युलीओ फर्नाडिस विरोधातील हा सातवा गुन्हा होता. नर्सिंग होममध्ये येणाऱ्या गरीब व गरजू महिलांना हेरायचे. पैशांचे आमिष देत त्यांच्या नवजात बालकांची ७ ते १० लाखांत विक्री केली जात होती. पालकही कुठे परिस्थितीअभावी तर कुठे पैशांच्या लालसेपोटी यामध्ये सहभागी होत होते. यावर नियंत्रण आणण्याचे आवाहन आजही यंत्रणासमोर कायम आहे.