Join us  

रात्री घडल्या मोठ्या हालचाली, फडणवीसांनी घेतली गुप्त बैठक, कुणाला भेटले? तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 7:59 AM

Maharashtra Political Crisis: आतापर्यंत राज्यातील सर्व घडामोडींकडे केवळ लक्ष ठेवून असलेल्या भाजपानेही आता हालचाली करण्याच सुरुवात केली आहे. आतापर्यंत या सर्व घडामोडींबाबत मौन बाळगून असलेले देवेंद्र फडणवीस हेही आता सक्रिय झाले असून, काल रात्री फडणवीसांनी मुंबईबाहेर एक गुप्त बैठक घेतली.

मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील मंत्री आणि आमदारांनी पुकारलेल्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. बंडखोर शिवसेना आमदार आणि शिवसेना नेतृत्व एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवत आहेत. दरम्यान, आतापर्यंत या सर्व घडामोडींकडे केवळ लक्ष ठेवून असलेल्या भाजपानेही आता हालचाली करण्याच सुरुवात केली आहे. आतापर्यंत या सर्व घडामोडींबाबत मौन बाळगून असलेले देवेंद्र फडणवीस हेही आता सक्रिय झाले असून, काल रात्री फडणवीसांनी मुंबईबाहेर एक गुप्त बैठक घेतली. सुमारे १० तास मुंबई बाहेर असलेले फडणवीस सकाळी सागर बंगल्यावर परतले.

शिवसेनेत बंडाळी होऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदार आधी सूरत आणि तिथून गुवाहाटी येथे पोहोचले. या काळात भाजपाकडून वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली होती. तसेच या सर्वाशी आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत होते. मात्र आता भाजपा या संपूर्ण प्रकरणात सक्रिय झाला आहे. तसेच ठाकरे सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, काल रात्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईबाहेर जाऊन एक गुप्त बैठक घेतली. फडणवीस सुमारे १० तास मुंबईबाहेर होते. या काळात त्यांनी कुणाची भेट घेतली आणि त्यात काय चर्चा झाली याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. आज सकाळी सुमारे १० तासांनंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईत परतले आहेत.

राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज होणार आहे. तसेच त्यात पुढील रणनीती ठरणार आहे. त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस हे आज रामदास आठवले तसेच भाजपाच्या इतर मित्रपक्षांची भेट घेणार आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र