लाडकी ‘वनराणी’ पुन्हा धावली; राष्ट्रीय उद्यानाची शान वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:20 IST2026-03-15T14:20:37+5:302026-03-15T14:20:37+5:30
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी तिचे उद्घाटन केले. ती बॅटरीवर चालणारी आणि पर्यावरणपूरक आहे.

लाडकी ‘वनराणी’ पुन्हा धावली; राष्ट्रीय उद्यानाची शान वाढली!
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यानंतर २०२१ मध्ये बंद करण्यात आलेली ‘वनराणी’ टॉय ट्रेन पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धावण्यास सुरुवात झाली आहे. ‘जंगलाची राणी’ म्हणून तिची ओळख आहे. या ट्रेनमुळे पर्यटकांना सर्वात मोठ्या हिरवळीच्या पट्ट्यातील अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी तिचे उद्घाटन केले. ती बॅटरीवर चालणारी आणि पर्यावरणपूरक आहे.
पर्यटक
पाहुण्यांना राष्ट्रीय उद्यानात अविस्मरणीय प्रवास अनुभवता येईल.
ट्रेनमध्ये हेरिटेज आणि व्हिस्टा डोम डबे असून प्रवाशांना निसर्गरम्य दृश्ये अनुभवता येतील.
सोईसुविधांवर भर...
यात आधुनिक डबे, सुधारित सुरक्षा व्यवस्था आणि उन्नत स्थानके आहेत. ट्रेनमध्ये हेरिटेज आणि व्हिस्टा डोम डबे असून ते प्रवाशांना निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव देतात. दरम्यान, येथे पर्यटकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी ई-बग्गी, ई-बस, सायकलिंग उपक्रम, थीमॅटिक गार्डन्स आणि सुधारित सफारी पायाभूत सुविधा यांसारखे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
कान्हेरी लेणी सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळखले जाणारे वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटकांसाठी सुधारित सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री
उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ.प्रवीण दरेकर आदी उपस्थित मान्यवर.