‘कोस्टल’चे सौंदर्य आणखी खुलणार, ५३ हेक्टरवरील विकासाला मंजुरी देण्यासाठी ‘लँड स्केपिंग कमिटी’
By सीमा महांगडे | Updated: October 15, 2025 09:48 IST2025-10-15T09:47:10+5:302025-10-15T09:48:21+5:30
कोस्टल रोडच्या बाजूंना ७० हेक्टर जागेवर हरितक्षेत्र तयार केले जाणार आहे. त्यासाठी ४०० कोटींपर्यंत खर्च येणार आहे.

‘कोस्टल’चे सौंदर्य आणखी खुलणार, ५३ हेक्टरवरील विकासाला मंजुरी देण्यासाठी ‘लँड स्केपिंग कमिटी’
- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने बांधलेल्या ‘कोस्टल रोड’च्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या आराखड्याचे परीक्षण करून मंजुरी देण्यासाठी पालिका स्वतंत्र ‘लँड स्केपिंग कमिटी’ नियुक्त करणार आहे.
ही समिती केवळ आराखडा मंजुरीपुरतीच मर्यादित राहणार नसून सौंदर्यीकरणासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी ‘सिंगल विंडो फॅसिलिटेटर’ म्हणूनही काम करणार आहे. त्यामुळे सर्व मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी आणि विनाखर्च पार पडतील.
कोस्टल रोडच्या बाजूंना ७० हेक्टर जागेवर हरितक्षेत्र तयार केले जाणार आहे. त्यासाठी ४०० कोटींपर्यंत खर्च येणार आहे. त्यासाठी पालिकेने भागीदारी संस्था किंवा कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवल्या होत्या. त्यात ‘रिलायन्स’ची निवड झाली आहे.
दोन टप्प्यांमध्ये कामे
कोस्टल रोडचे सौंदर्यीकरण दोन प्रमुख भागांत विभागले गेले आहे. टाटा सन्स लिमिटेड ही कंपनी या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ५ हेक्टर पट्ट्याचे सौंदर्यीकरण व देखभाल करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला ५३ हेक्टर खुल्या जागेच्या विकासाचे काम सोपविले आहे.
व्यावसायिक वापर न्यायालय ठरवणार
या जागेच्या व्यावसायिक वापरांचेही अधिकार रिलायन्स कंपनीलाच दिले आहेत. व्यावसायिक वापराचे अधिकार हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहेत. न्यायालयाने परवानगी दिल्यास या ठिकाणी तिकीट शुल्कसह इतर व्यावसायिक वापरांचे अधिकार हे रिलायन्स कंपनीकडेच राहणार आहेत.
उद्याने, रोषणाई, सीसीटीव्ही
सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पात देखभाल, सुरक्षा, उद्याने, रोषणाई, सीसीटीव्ही, शौचालये, पाणी पुनर्वापर व्यवस्था (एसटीपी) तसेच पर्यावरण संरक्षणाच्या शाश्वत उपायांचा समावेश आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रस्तावास अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
मते या मंजुरीनंतर समिती लवकरच नेमण्यात होईल.
रिलायन्स कंपनी ५३ हेक्टर जमिनीवर हरितक्षेत्र, उद्याने तसेच इतर सार्वजनिक सुविधा विकसित करणार आहे. हे सर्व सौंदर्यीकरण आणि त्याच्या देखभालाची जबाबदारी पुढील ३० वर्षे रिलायन्सकडे असेल.
कोस्टल रोडची लांबी १०. ८ किलोमीटर असून, एकूण १८ अंतरमार्गिका आहेत. तर, खुली/हरित जागा ७० हेक्टर इतकी आहे.