ताई, माई, आक्का, वाढू दे मतदानाचा टक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:26 IST2026-01-14T06:26:25+5:302026-01-14T06:26:25+5:30
मुंबई-ठाण्यात सध्या मराठीचा मुद्दा गाजत असल्याने मराठी तारे-तारका मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरतील अशी आशा

ताई, माई, आक्का, वाढू दे मतदानाचा टक्का...
मुंबई : प्रचाराची रणधुमाळी शांत झाली असून, आता मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे. आम्ही बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सकाळीच मतदान करणार आहोत. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कलाकारांनी केले आहे.
मुंबई-ठाण्यात सध्या मराठीचा मुद्दा गाजत असल्याने मराठी तारे-तारका मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरतील अशी आशा चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी व्यक्त केली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी योग्य उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. दरवेळेप्रमाणे याही वेळी सकाळी मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाले, मतदानादिवशी कोणीही पिकनिकसाठी बाहेर जाऊ नका. नागरिक म्हणून आपल्या सरकार व लोकप्रतिनिधींकडून कामे पूर्ण करण्याच्या अपेक्षा असतात. प्रत्येक मागणीसोबत कर्तव्यही येते. परंतु, आपण मतदानाचा हक्क बजावत नाही, तोपर्यंत त्या हक्काशी निगडीत सवलती मागण्याचा अधिकार आपणास नाही. बोरिवली पूर्व येथे सकाळी मतदान करणार असून, तुम्हीही मतदान करा.
मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील विविध कलाकार आपापल्या प्रभागात मतदान करणार आहेत. दादरमध्ये वंदना गुप्ते, गायक अनुप जलोटा, भारती आचरेकर, प्रभादेवीमध्ये निर्मिती सावंत, माटुंगा येथे सिद्धार्थ जाधव, पवईमध्ये सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक केदार शिंदे, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, माहीममध्ये सुकन्या मोने, संजय मोने, अजित भुरे हे कलाकार मतदान करतील.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमध्ये आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, बिंबिसार नगरमध्ये पुष्कर श्रोत्री, दिंडोशीत हेमंत ढोमे, अक्षया गुरव, पल्लवी सुभाष, वीणा जामकर, उपेंद्र लिमये, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, समीर धर्माधिकारी, बांद्रा येथे रोहिणी हटंगडी, भरत जाधव, आदिती भागवत, आदिती गोवित्रीकर, गोरेगावात अमृता खानविलकर, अंधेरीत अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगावकर, जॉनी लिव्हर, मनीषा केळकर, सविता प्रभुणे, गणेश यादव, तुषार दळवी, मालाडमध्ये सई ताह्मणकर, जुहूमध्ये किशोरी शहाणे मतदान करणार आहेत.
बॉलीवूडचेही दिग्गज करणार मतदान
सलमान खान, सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान बांद्रा येथे, तर अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, गौरी खान, सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डॅन्झोप्पा आदी बरेच कलाकार जुहूमध्ये मतदानाचा हक्क बजावतील.