Join us  

खुनाचा कट उधळला; अँटॉपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:36 AM

अँटॉपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

मुंबई : अँटॉपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या आरोपीच्या टार्गेटवर आणखी दोघेजण असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले. कारवाईमुळे दोघांच्या हत्येचा कट उधळला. विवेक देवराज शेट्टीयार (वय २६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केली आहेत.गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने ही कारवाई केली आहे. 

अँटॉपहिल नाईकनगर परिसरात ६ एप्रिल रोजी गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. या हल्ल्यात अक्षय कदम ऊर्फ स्वामी (वय ३४) जखमी झाला असून  त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मित्रांसह टॅक्सीमध्ये आला आणि सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या अक्षयच्या घराचे दार त्याने ठोठावले. अक्षयने दरवाजा उघडताच आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय गंभीर जखमी झाला. उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी  अँटॉपहिल पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

कोरोना कालावधीत सुटलेला पॅरोलवर -

१) आरोपीला न्यायालयाने कोरोना कालावधीत पॅरोलवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहामध्ये हजर झालेला नव्हता. 

२) आरोपीकडे केलेल्या चौकशीत तो आणखी दोन व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली.

३) मात्र, गुन्हे शाखेने  वेळीच कारवाई केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले आहे.

आरोपीकडून पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे जप्त -

पोलिस उपायुक्त दत्ता नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून डोंबिवली परिसरात लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली.

त्यानुसार, कटई नाका परिसरातून आरोपीला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व एक रिकामी पुंगळी मिळून आली.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस