Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानात रुग्णासाठी 'देवदूत' धावून आला; मेडिकल विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 07:48 IST

प्रसंगावधान राखून डॉ. आर्यन यांनी संबंधित प्रवाशाला कृत्रिम श्वासोच्छास देऊन त्यांचा जीव वाचविला

नालासोपारा - विमान प्रवासात एका प्रवाशाला अचानक चक्कर येऊ लागली. त्याच्या रक्तातील साखर वेगाने कमी झाल्याने त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. हजारो फूट उंचीवर अशा आणीबाणीच्या प्रसंगी या प्रवाशासाठी अक्षरशः 'देवदूत' धावून आला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजमधील अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि वसईचा रहिवासी असलेल्या डॉ. आर्यन लोलयेकर याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रकृती बिघडलेल्या प्रवाशाला जीवदान मिळाले. ३ फेब्रुवारी रोजी गोवा ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान ही घटना घडली.

प्रसंगावधान राखून डॉ. आर्यन यांनी संबंधित प्रवाशाला कृत्रिम श्वासोच्छास देऊन त्यांचा जीव वाचविला. गोवा येथील दाबोलीम विमानतळावरून दुपारी ३:५० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान मुंबईसाठी झेपावले. काही वेळातच एका सहप्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने कमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विमानातील क्रू मेंबर्सनी 'विमानात कोणी डॉक्टर आहे का?' अशी विचारणा केली. यावेळी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. आर्यन लोलयेकर यांनी जराही वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली.

तत्परतेमुळे प्रकृती स्थिर

डॉ. आर्यन यांनी उपलब्ध आपत्कालीन ऑक्सिजन सिलिंडरद्वारे रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छास दिला. ४५ मिनिटांनंतर विमान मुंबईत उतरले. इंडिगो ग्राउंड स्टाफने रुग्णाला रुग्णालयात हलवले. डॉ. आर्यन यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात आभार मानले.

प्रवाशाची अवस्था पाहून क्षणभर भीती वाटली पण वैद्यकीय शिक्षणाने मला धैर्य दिले. रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर परिस्थिती गंभीर झाली असती. एका जीवाचे प्राण वाचवू शकलो, याचे समाधान मोठे आहे. - डॉ. आर्यन लोलयेकर

English
हिंदी सारांश
Web Title : Medical student saves passenger's life mid-flight with quick thinking.

Web Summary : A medical student, Dr. Aryan Lolayekar, saved a passenger's life on a Goa-Mumbai flight. The passenger's blood sugar dropped drastically. Dr. Aryan provided timely oxygen, stabilizing him until the plane landed. His quick thinking was lauded by passengers.
टॅग्स :आरोग्य