ठाण्याची खाडी ठरतेय पक्ष्यांसाठी सुरक्षित; मुंबई, उरणपेक्षा अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 13:30 IST2021-08-29T13:28:49+5:302021-08-29T13:30:03+5:30
पक्ष्यांनी अगदीच मुंबई सोडली नसली, तरी त्यांचा ठाणे खाडीतील वावर वाढल्याचे हा अभ्यास सांगतो.

ठाण्याची खाडी ठरतेय पक्ष्यांसाठी सुरक्षित; मुंबई, उरणपेक्षा अधिक पसंती
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईच्या महानगर क्षेत्रातील खाडीत प्रचंड प्रमाणात सोडले जाणारे सांडपाणी, रिफायनरीज आणि ऊर्जा प्रकल्पांतून बाहेर पडणारे कोमट पाणी यामुळे पक्ष्यांना अन्न मिळविण्यासाठी योग्य अधिवास विकसित झाले, असे सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशनच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गेल्या ३० वर्षांत केलेल्या पाहणीत मुंबई, उरणपेक्षा ठाण्याच्या खाडीला पक्षी अधिक पसंती देत असल्याचे आढळून आले.
पक्ष्यांनी अगदीच मुंबई सोडली नसली, तरी त्यांचा ठाणे खाडीतील वावर वाढल्याचे हा अभ्यास सांगतो. रोहित पक्षी आणि पाणथळ भागात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना संकुचित होत चाललेल्या नदी-नाल्यांचा फायदा झाला. त्यांचा अन्नपुरवठा वाढला. मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीपातळी वाढत असल्याने, तसेच गेल्या ३० वर्षांत सागरी किनारा परिसंस्थेत बदल झाल्याने या भागातील १०७.६ चौ कि.मी. नदी, नाले आणि शेत जमीनयुक्त क्षेत्र नैसर्गिकरीत्या लुप्त झाले. त्याचे रूपांतर गाळयुक्त दलदल किंवा कांदळवनात झाले. त्याच्या १९९० ते २०१९ पर्यंतच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. उपग्रहांद्वारे पाहणी झाली. त्यात हे निष्कर्ष समोर आले आहेत.
नव्याने निर्माण झालेली जमीन ही कांदळवनांनी भरून गेली; पण पावसाळ्याशिवाय इतर ऋतूंत येथील जलसाठ्यात घट झाली, तर सुपीक गाळयुक्त दलदलींचे हे क्षेत्र कडक आणि ओसाड जमिनीत रूपांतरित होईल. तसे झाले, तर या भागातील रोहित पक्षी कायमचे त्यांचा अधिवास सोडून निघून जातील. - डॉ. दीपक आपटे, कार्यकारी संचालक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन
खार जमिनींत वाढ
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने किनारपट्टीच्या प्रदेशात, खाडीच्या किनाऱ्यालगतच्या किंवा समुद्राजवळील बहुतेक शेती जमिनींत उधाणाचे पाणी शिरते. त्यातून क्षारयुक्त किंवा खार जमिनींचे प्रमाण वाढते आहे.