Thana's Voice in Jaipur Literature Conference, Sanket mhatre present Poetry | जयपूर साहित्य संमेलनात ठाण्याचा आवाज, संकेत म्हात्रे सादर करणार कविता
जयपूर साहित्य संमेलनात ठाण्याचा आवाज, संकेत म्हात्रे सादर करणार कविता

ठाणे - भारतातील प्रसिद्ध साहित्यउत्सवांपैकी एक असलेला जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल हा २२ ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. मराठी साहित्यासाठी विशेष बाब म्हणजे यंदा या फेस्टिव्हलमध्ये तरुण मराठी साहित्यिकाची निवड झालेली असून ठाणेकर कवी संकेत म्हात्रे हे आपल्या कविता सादर करून मराठी साहित्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल हा जगप्रसिद्ध आहे. गेल्या दशकापासून या संमेलनात विविध भाषीय महत्त्वाचे लेखक, विचारवंत आणि कवी यांचा समावेश केला जातो. हरी कुंजरू, विलियम दालरिम्पल, शोभा डे, सलमान रश्दी, किरण देसाई अशा प्रसिद्ध साहित्यिकांनी आपले साहित्य तसेच साहित्यविषयक संवाद येथे सादर केले आहेत.

यावर्षी होणाऱ्या या साहित्यउत्सवाच्या प्रतिष्ठित मंचावर मराठी कवितेचाही समावेश केला गेला आहे. तरुण मराठी कवी संकेत म्हात्रे यांच्या कवितांची निवड झाली असून ते २६ जानेवारी रोजी होणाºया कवीसंमेलनात कविता सादर करणार आहेत. त्यांच्या सोबत या सत्रात प्रख्यात कवी रूथ पाडेल, ए. जे. थॉमस, आसिया जहूर, रितुप्रिया, रोशेल पोतकर आणि निरुपमा दत्त यांच्याही कवितांचं वाचन होणार आहे.

‘मराठी कवितेचा समावेश इथल्या साहित्य मंचावर होणं फार गरजेचं आहे. या काळातला मराठी कवितेचा आवाज आणखीन प्रौढ आणि सर्वसमावेशक आहे आणि त्यामुळेच मराठी कविता जागतिक साहित्यक्षेत्रात स्वत:ची वेगळी जागा निर्माण करत आहे.
जयपूरच्या साहित्य समितीने या नाविण्यपूर्ण विचारांची आणि नव्या आवाजाची नोंद घेणं हे स्वाभाविक होतं. येणा-या काळात अधिकाधिक मराठी कवींचा सहभाग अशा प्रसिद्ध साहित्य संमेलनात झाला तर अभिमान वाटेल’, असे मत संकेत म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Web Title: Thana's Voice in Jaipur Literature Conference, Sanket mhatre present Poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.