Join us  

Exclusive: 'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार बाळासाहेबांचाच 'आवाssज'!

By अमेय गोगटे | Published: December 31, 2018 4:44 PM

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गेट-अपचं, त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होतंय. सगळे प्रसंग आणि डायलॉग सैनिकांच्या मनावर शहारा आणताहेत. पण, मराठी ट्रेलरमधील एक गोष्ट फारशी कुणालाच आवडलेली नाही; ती म्हणजे बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेला अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज. या नाराजीचे पडसाद सोशल मीडियावर उमटताहेत. बाळासाहेबांना बाळासाहेबांचाच आवाज असायला हवी, अशी तीव्र इच्छा नेटकरी व्यक्त करताहेत. त्याची दखल ठाकरेच्या निर्माता-दिग्दर्शकांनी घेतली असून, 'साहेबां'चा आवाज बदलण्याबाबत विचार सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. विशेष म्हणजे, नेटिझन्सच्या इच्छेनुसार आवाजाचे जादुगार, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्याची तयारी केली जातेय. 

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा खर्जातला आवाज ऐकून अख्खं शिवाजी पार्क उसळायचं. कारण, त्या आवाजात जरब होती, दम होता, वेगळीच जादू होती. व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या प्रवासात या आवाजाची भूमिका खूपच मोलाची ठरली होती. त्याच्याच जोरावर बाळासाहेबांनी भल्याभल्यांना हादरवलं होतं, मराठी माणसाला - हिंदूंना साभाळलं होतं, शिवसैनिकांना बळ दिलं होतं. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या सभा आजच्या तरुणाईनं ऐकल्यात. त्यांचा आवाज महाराष्ट्रवासीयांच्या मनात आहे. म्हणूनच, 'ठाकरे'मध्ये बाळासाहेबांसाठी वापरलेला आवाज सगळ्यांनाच खटकला आणि त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. 'लोकमत डॉट कॉम'ने सगळ्यात आधी या संदर्भातील बातमीही दिली होती.

 

ब्लॉकबस्टर सिनेमात जसे कड्डक डायलॉग असतात, तसंच बाळासाहेब प्रत्यक्षात बोलायचे. त्यामुळे त्यांच्या जीवनावरील सिनेमात संवाद लेखकाला तसं फारसं काम नव्हतंच. पण, या संवादांना त्यांच्यासारख्याच जबरदस्त आवाजाचीही जोड असायला हवी होती, असं शिवसैनिकांसह तमाम मराठीजनांना राहून राहून वाटतंय. हिंदी ट्रेलरमध्ये बाळासाहेबांना नवाजुद्दीनचाच आवाज आहे, तर मराठीत तो अभिनेते सचिन खेडेकर यांनी डब केलाय. पण या दोन्ही आवाजांना बाळासाहेबांच्या खऱ्या आवाजाची सर नाही. सचिन खेडेकर यांच्या आवाजातील काही डायलॉग तर 'शिवाजीराजे भोसले बोलतोय' सारखेच वाटतात. याउलट, 'बाळकडू' या चित्रपटात चेतन शशितल यांनी बाळासाहेबांचा हुबेहूब आवाज काढून सगळ्यांना थक्क केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून किंवा त्यांच्यासारख्या एखाद्या डबिंग आर्टिस्टकडून बाळासाहेबांचा आवाज घेता आला असता. त्यामुळे सिनेमातील घटनांना वेगळं वजन आणि वलय प्राप्त झालं असतं, असं अनेकांचं मत आहे. तरुणांनी ते सोशल मीडियावर मांडलं, तर माध्यमांनी बातम्याही केल्या. त्यामुळे 'ठाकरे' सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक ही चूक सुधारण्यावर काम करू लागले आहेत. त्यांच्यात फोनाफोनी झाली असून चेतन शशितल यांचंच नाव चर्चेत असल्याचं सिनेमाशी संबंधित व्यक्तीनं 'लोकमत डॉट कॉम'ला सांगितलं. 

सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत आवाजाबाबत, डबिंगबाबत अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. अगदी आठवड्याभरात जरी हा निर्णय झाला, तरी सगळे डायलॉग बदलून घेणं शक्य असल्याचं सूत्रानं स्पष्ट केलं. तसं झाल्यास, २५ जानेवारीला पुन्हा एकदा महाराष्ट्र 'ठाकरे'मय होऊन जाईल, हे नक्की. 

टॅग्स :ठाकरे सिनेमाबाळासाहेब ठाकरेनवाझुद्दीन सिद्दीकी