“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:05 IST2025-06-03T17:04:57+5:302025-06-03T17:05:36+5:30
Sushma Andhare News: महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केला.

“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे
Sushma Andhare News: प्रसिद्धी मिळायला रुपाली चाकणकर कोण आहेत? रश्मिका मंदाना आहेत का? की स्मृती इराणी आहेत? कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रिमो आहेत? राजकारण, बॉलिवूड की प्रशासनातल्या सुप्रिमो आहेत? कोण आहेत चाकणकर की, त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते. काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात, त्यांनी या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर यावे, या खोचक शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला.
प्रसिद्धी मिळवण्याकरता विरोधक माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करत आहेत, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. यावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. महामहिम राज्यपाल महोदयांच्या समवेत महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि आश्वासक ठरली. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली?
१) वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये पोलीस आणि राजकीय वरदहस्त याचा विचार करता हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावे तसेच या प्रकरणातील चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजेच पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर तथा त्यांचे सख्खे मेहुणे व खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा या प्रकरणातील अतिरिक्त हस्तक्षेप टाळावा तसेच शशिकांत चव्हाण व जालिंदर सुपेकर यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
२) लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने आर्थिक तरतूद निश्चित करावी मात्र यासाठी सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी कल्याण विभागाचा निधी वळता करू नये. पार्टी महाज्योती सारथी या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळायला हवी.
३) पुणे जिल्ह्यातील विशेषतः लोहगाव विमान नगर विश्रांतवाडी धानोरी या परिसरातील अनाधिकृत पगार यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी पुणे आयुक्तांना सूचना निर्गमित कराव्यात तथा ड्रग्स विरोधी मोहीम अधिक तीव्र व्हावी.
४) राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता या बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या शोध मोहिमेसाठी विशेष कक्ष कार्यान्वित व्हावा.
५) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परिघ अज्ञात असणारी व्यक्ती असावी. आयोगाची रिक्त असणारी सदस्य पदे तात्काळ भरली जावीत. विभागीय कार्यालय सुरू व्हावीत. आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी ओ राजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी.