Sanjay Raut Meet Sharad Pawar: राज्यात आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पहलगाम हल्ल्यावरून देशात तणावाचे वातावरण असून, दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. भारताकडून पाकविरोधात अनेक निर्णय घेतले जात असून, अनेक निर्बंधही लादण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यावरून महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याबाबत महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांच्या भेटीबाबतची माहिती दिली आहे. तसेच संजय राऊतांच्या भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. राज्यसभेचे खासदार तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य व देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या, असे शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यकर्माला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. यावेळी ते जवळपास शंभर दिवस तुरुंगात होते. तुरुंगातील या अनुभवावर हे पुस्तक आधारित आहे.