“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:17 IST2025-05-06T19:14:08+5:302025-05-06T19:17:49+5:30

Thackeray Group News: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

thackeray group kishori pednekar claims that we have all the planning today we can give 3 thousand to women | “आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

Thackeray Group News: तुमचा जुमला होता, आमच्याकडे प्लॅनिंग होते. आम्ही ते जाहीर करावे. आमच्याकडे आजही प्लॅनिंग आहे. आम्ही महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो. पण आम्ही आमची गुपिते का उघड करावीत. तुम्ही महानगरपालिका लुटत आहात. लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांचे २१०० देणार हे तुम्ही कबूल केले होते. ते कधी देणार याचे उत्तर द्यावे, अशी विचारणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. 

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सदर दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे जायला हवे. न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्याचे पालन व्हायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले आहेत. मुंबईसह राज्यभरात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याचा विचारही व्हायला हवा. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत

आम्ही निवडणुकांसाठी सज्ज आहोत. तुम्ही निवडणुका जाहीर करा. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायला हव्यात. मुंबई महापालिका आणि मुंबईकरांची अवस्था काय झाली आहे, हे सगळ्यासमोर आहे. त्यामुळे निवडणुका व्हायलाच हव्यात, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मांडलेल्या भूमिकेच्या संदर्भात किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, केंद्र सरकारच्या कारवाईला आमचे समर्थन असेल, असे संजय राऊतांनी आधीच सांगितले आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आम्ही कोणतेच प्रश्न उपस्थित करू नयेत. देशभरातील लोकांच्या ज्या काही भावना आहेत, त्याच ते बोलून दाखवत आहेत. त्याची उत्तरे केंद्र सरकारने द्यायला हवीत. हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही सापडलेले नाहीत. याबाबत सरकारला प्रश्न विचारणे चुकीचे आहे का, अशी सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. 

दरम्यान, कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडकवून ठेवण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आम्ही तयार आहोत. किंबहुना आम्ही वारंवार मागणी करत होतो की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात निवडणुका घेणे महत्त्वाचे आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा इथे जर लोकप्रतिनिधींचे सरकार नसेल, तर लोकांनी कामे कुणाकडे घेऊन जायची? विकास कसा होणार? आज मुंबईची अवस्था पाहा. ठाण्यात जाऊन पाहा. महापालिका निवडणुका न झाल्यामुळे या शहरांना कशी दुर्गंधी प्राप्त झाली आहे. या निकालाचे आम्ही स्वागत करतो. चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्धसराव आधी झालेला आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे सोपे नाही. तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: thackeray group kishori pednekar claims that we have all the planning today we can give 3 thousand to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.