Join us  

“सगळे थोतांड, फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल”; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 8:44 AM

‘जन की पुकार, ठाकरे सरकार… अब की बार ठाकरे सरकार’ असा नारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Uddhav Thackeray News ( Marathi News ): सगळी फसवाफसवी सुरू आहे. विकास रथ फिरवत आहेत. ते थोतांड आहे. चार कोटी घरे आम्ही दिली म्हणतात, पण ती कोणाला दिली याचा काहीच पत्ता नाही. या फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल. त्यासाठी गावागावात जाऊन लोकांना आपल्याला विचारावे लागेल. घर मिळाले का, उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला का, अशी विचारणा करावी लागेल. म्हणजे खोटे बोलणारे उघडे पडतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठा यात्रेने वर्धा ते मुंबई असा प्रवास केला. या यात्रेतील शिवसैनिक सायकलने मुंबईत दाखल झाले. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून निहाल पांडे यांचे कौतुक केले. ‘जन की पुकार, ठाकरे सरकार… अब की बार ठाकरे सरकार’ असा नारा देत निहाल पांडे यांनी ही यात्रा काढली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. 

‘होऊ दे चर्चा’ मोहीम गावागावात राबवा

उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर सडकून टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही काहीतरी मोठे काम केले, असे देशभरात मोदी सरकारकडून दाखवले जात आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीच केलेले नाही. सगळे खोट्याचे नाटक आहे. माझ्या गावात नाही दुसऱ्या गावात विकास झाला असेल असे प्रत्येकाला वाटत आहे. पण जेव्हा सगळे एकमेकांशी बोलतील तेव्हा लक्षात येईल की, कोणालाच काही मिळालेले नाही. त्यामुळेच ‘होऊ दे चर्चा’ मोहीम गावागावात राबवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

दरम्यान, ‘युवा परिवर्तन की आवाज’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी गावागावात ऐकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. महाविकास आघाडी सरकार असताना बळीराजा सुखी होता. आता मात्र या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. बळीराजा संकटांच्या कात्रीत सापडला आहे. पीक विमा योजनेच्या नावाखाली फसवाफसवी सुरू आहे. त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना