Join us

“१० व्या वर्षापासून RSSशी संबंध, मी सुद्धा पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:04 IST

Thackeray Group Ambadas Danve Vidhan Parishad News: ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Thackeray Group Ambadas Danve Vidhan Parishad News: वयाच्या दहाव्या वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. त्यावेळी ज्या ठिकाणी संघाचे काम होते, त्या ठिकाणी शिवसेना मजबूत झाली. तिरंगा फडकवायला मुरली मनोहर जोशी काश्मीरला गेले होते. त्यावेळी मीदेखील तिथे होतो. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका, असे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीसह विरोधक सत्ताधारी महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तर, महायुती सरकार विरोधकांना जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. यातच लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरत आहे, असा दावा करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन केले. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील सदस्य अंबादास दानवे यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे विधान परिषद सदस्यांकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अंबादास दानवे यांनी मनोगत व्यक्त केले.

गिरीश महाजन आणि मी सतरंजीवर झोपायचो

माझ्यावर अनेक केसेस झाल्या दोन तीन वेळा तडीपार नोटीस निघाल्या. एक काळ असा होता गिरीश महाजन आणि मी सतरंजीवर झोपायचो, अशी आठवण अंबादास दानवे यांनी सांगितली. तसेच शिवसेनाप्रमुखांना पहिल्यांदा भेटायला गेलो होतो, त्यावेळेस खैरे आणि रावते यांच्यामध्ये काहीसा वाद होता. बाळासाहेब म्हणाले की तुम्ही खैरेंचे की रावतेंचे? मी म्हणालो की, आम्ही तुमचेच. त्यानंतर बाळासाहेब जे म्हणाले, ते माझ्या मनावर कोरले गेले. बाळासाहेब म्हणाले की, मी उद्या शिवसेना सोडून गेलो तर? त्यामुळे तुम्ही माझे, खैरे किंवा रावतेंचे राहू नका. तुम्ही शिवसेनेचे राहा. नेमका तोच विचार घेऊन आतापर्यंत मी काम केले, असे अंबादास दानवे यांनी नमूद केले.

दरम्यान, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानिमित्ताने विधान परिषदेमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषद सदस्य, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली. या सर्वांनी अंबादास दानवे यांच्या कामगिरीचा गौरव केला.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३विधान परिषदविधान भवनअंबादास दानवेशिवसेना