Join us

“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:23 IST

Ambadas Danve News: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

Ambadas Danve News: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात आले नाही,  ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याची मागणी दानवे यांनी केली.

राज्यात मागील काही काळात पुणे जिल्ह्यातील माळीण गाव, रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्युमुखी पडल्यानंतरही सरकारने  याबाबत गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक

दरडग्रस्त तळीये गावात दरड कोसळून ६६ लोकांचा मृत्यू झाला असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याचे शासनाने ठरवले होते. आतापर्यंत फक्त ६६ कुटुंबांना घरे मिळाली असून बाकीचे कुटुंब अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. सदरील ठिकाणी अजूनही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी दानवे यांनी केली. या पावसाळ्यात या दरडग्रस्त भागात अशाच काही घटना घडण्याची  शक्यता दानवे यांनी व्यक्त करत आज या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधान परिषद सभागृहात सूचना केली.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३विधान परिषदअंबादास दानवेविधान भवन