Join us  

कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 1:36 AM

एखाद्या नागरिकाचे अकाऊंट रद्द करण्याचे आदेश थेट राज्य सरकार देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडली.

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची आहे. त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. ट्विटर ही एक सोशल मीडियावर साइट आहे. त्यावर कुणी काय पोस्ट कारावे यावर त्यांचे थेट नियंत्रण नसते. त्यामुळे जर त्यावरील मजकूर आक्षेपार्ह असेल तर त्यासाठी तक्रार देण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या नागरिकाचे अकाऊंट रद्द करण्याचे आदेश थेट राज्य सरकार देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडली.कंगनाचे ट्विटर अकाउंट निष्क्रिय करण्यात यावे, अशी याचिका ॲड. अली काशिफ खान देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कंगना रनौतच्या विरोधात अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तिने स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वादग्रस्त ट्विट केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबतही तेच करत आहे, असा युक्तिवाद देशमुख यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे केला. त्यावर न्यायालयाने ही जनहित याचिका आहे का, असा सवाल देशमुख यांना केला. न्यायालयाने नमूद केले की, आम्ही ही फौजदारी याचिका कशी दाखल करून घेऊ? फौजदारी याचिकेत तिसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून आम्ही कारवाई करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेकंगना राणौत