Join us  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार; ठाकरे सरकार नवा प्रस्ताव आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:20 PM

Dr. Babasaheb Ambedkar's Statue : मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवा प्रस्ताव आणण्यात येणार

मुंबई: इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढवण्यासाठी ठाकरे सरकार नवा प्रस्ताव आणणार आहे. आंबेडकरांच्या स्मारकाची उंची २५० फुटांवरुन ३५० फुटांपर्यंत वाढवण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा प्रस्ताव आणला जाईल. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादरमधील इंदू मिलला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता. मंत्रिमंडळामध्ये आवश्यक निर्णय घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. काहीही झालं तरी स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जानेवारीला स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर दिली होती. डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाचं स्मारक हे भव्यदिव्य, तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल, त्याचा नेटकेपणा आणि पावित्र्य राखलं जाईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 10 ऑक्टोबर 2015 रोजी भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. मात्र भूमिपूजनाला दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या आधी आंबडेकर स्मारकाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. 

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरअजित पवारउद्धव ठाकरे