पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:53 IST2025-08-24T07:52:19+5:302025-08-24T07:53:18+5:30
The Municipal Co-oprative Bank Elections: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले असून, प्रथमच विष्णू भोईर आणि किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली आहे.

पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
मुंबई - मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या पॅनलचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले असून, प्रथमच विष्णू भोईर आणि किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली आहे. गेली १० वर्षे बँकेचे संचालक मंडळ प्रस्थापित पॅनलच्या ताब्यात होते. जय सहकार पॅनल हे प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असून ठाकरे गटाचे काही उमेदवार या पॅनलमधून लढत होते.
दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ६० हजार १३४ सभासदांपैकी २९ हजार ११९ सभासदांनी मतदान केले होते. या निवडणुकीच्या रिंगणात वकील गुणवंत सदावर्ते यांनी शेवटच्या क्षणाला माघार घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह भाजपचे प्रवीण दरेकर यांच्याशी संलग्न पॅनलमध्ये खरी लढत होती.
शुक्रवारी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. या मतमोजणीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने एका व्यक्तीविरोधात पोलिस एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गोंधळामुळे काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली होती. मात्र तणाव निवळल्यानंतर पुन्हा मतमोजणीला सुरुवात झाली.
केवळ पाच जागी विजय
निवडणुकीत जय सहकार पॅनलचे केवळ पाच उमेदवार निवडून आले आहेत तर उर्वरित सर्व उमेदवार सहकार पॅनलचे आहेत. जय सहकार पॅनल हे ठाकरे गट आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याशी संलग्न होते. भाजपशी संलग्न असलेले विष्णू घुमरे यांच्यासह काही जण विजयी झाले असले, तरी ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांचा पराभव झाला.
बँक निवडणूक चर्चेत
एरव्ही या बँकेची निवडणूक फारशी चर्चेत नसते. मात्र, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्याने या बँकेची निवडणूक चर्चेत आली. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ॲड. गुणवंत सदावर्ते यांनी त्यांचे पॅनल उभे करण्याची घोषणा केली. मात्र, ऐनवेळी माघार घेत त्यांनी दरेकर यांच्या पॅनलशी जवळीक साधली.