ठाकरे बंधूंचा करिष्मा की महायुती? शिवसेनेतील फुटीनंतर आशियातील सर्वात मोठ्या पालिकेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:17 IST2025-12-16T10:17:11+5:302025-12-16T10:17:44+5:30
आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका असलेल्या मुंबईची निवडणूक यंदा मोठी रंगतदार होणार आहे.

ठाकरे बंधूंचा करिष्मा की महायुती? शिवसेनेतील फुटीनंतर आशियातील सर्वात मोठ्या पालिकेची निवडणूक
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका असलेल्या मुंबईची निवडणूक यंदा मोठी रंगतदार होणार आहे. गेल्या चार दशकांपासून एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत ठाकरे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, भाजपने महायुतीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर प्रथमच महापौर बसविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करून मुंबई महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्याचा नवा प्रयोग मनसे अध्यक्ष राज ठाकरे करीत असल्याचे चित्र आहे. तर, शिंदेसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उद्धवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकून शिवसेनेवर आपलाच खरा हक्क असल्याचे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत राज्यात युती असूनही भाजप व शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली. २२७ वॉर्डापैकी एकसंघ शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. भाजपने तेव्हा नमती भूमिका घेत शिवसेनेचा महापौर होऊ दिला होता. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे सत्तेचा ताबा राखण्याचे मोठे आव्हान ठाकरेंसमोर आहे. तर, शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत उद्धवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
ठाकरे बंधूंचा एकत्रित करिष्मा मुंबईकरांना पुन्हा आकर्षित करणार की महायुती जिंकणार? हे निकालानंतर कळेल. ही निवडणूक स्थानिक सत्तासंघर्षापुरती नसून राज्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.
२०१७ चे पक्षीय बलाबल - २२७नगरसेवक
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - ९
मनसे - ७
सपा - ६
एमआयएम - २
अभासे - १
अपक्ष - ५
सध्या कुणाकडे किती माजी नगरसेवक ?
भाजप - ८७
शिंदेसेना - ६३
उद्धवसेना - ४७
काँग्रेस - २१
शरद पवार गट - २
अजित पवार गट -२
समाजवादी पक्ष - ४
अभासे - १
मनसे - ०
ही दोन पदे महत्त्वाची...
मुंबईचे महापौरपद प्रतिष्ठेचे असले तरी सत्तेच्या आर्थिक नाड्या स्थायी समिती अध्यक्षांकडे असतात. सध्या पक्षफुटीनंतर शिंदेसेनेत तीन माजी स्थायी समिती अध्यक्षांनी प्रवेश केला आहे तर तीन माजी महापौर उद्धवसेनेकडे आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर दोन्ही सेनेचे लक्ष असेल.