माहीममध्ये शिंदेसेनेपुढे ठाकरे बंधूंचे आव्हान; पाच नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:00 IST2025-12-20T11:59:38+5:302025-12-20T12:00:40+5:30
५ नगरसेवक दादर व माहीम भागातून निवडले जातात. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान, मनसेचे मुख्यालय 'राजगड' ही महत्त्वाची राजकीय केंद्रे या भागात आहेत.

माहीममध्ये शिंदेसेनेपुढे ठाकरे बंधूंचे आव्हान; पाच नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार
सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठेच्या माहीम विधानसभा मतदारसंघात पाच नगरसेवक असून, २०१७ मध्ये एकसंध शिवसेनेचे चार आणि भाजपचा एक उमेदवार निवडून आला होता. शिवसेनेच्या चारपैकी एकाने शिंदेसेनेत प्रवेश केला तर अन्य तीन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. त्यात ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने शिंदेसेनेला आता महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे.
या विधानसभा मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे उद्धवसेनेचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी २०१७ ची निवडणूक १९४ क्रमांकाच्या प्रभागातून अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांचा केवळ २५९ मतांनी समाधान सरवणकर यांनी पराभव केला होता. समाधान सरवणकर सध्या शिंदेसेनेत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश सावंत यांनी समाधान यांचे वडील व शिंदेसेनेचे तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांना धूळ चारत विधानसभेत प्रवेश केला.
माहीममध्ये २०१७ मध्ये मिलिंद वैद्य (प्रभाग-१८२), विशाखा राऊत (१९१), प्रीती पाटणकर (१९२) आणि समाधान सरवणकर (१९४) हे एकसंघ शिवसेनेचे तर शीतल गंभीर (१९०) या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यंदा स्थानिक गणिते बदलली आहेत. ५ नगरसेवक दादर व माहीम भागातून निवडले जातात. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान, मनसेचे मुख्यालय 'राजगड' ही महत्त्वाची राजकीय केंद्रे या भागात आहेत.
ज्येष्ठांसमोर नवखे उमेदवार तग धरतील का ?
गेल्या २० वर्षांत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली असून, शिवसेना आणि मनसे पहिल्या दोन किंवा तीन क्रमांकात असतात. यंदा प्रथमच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्हे असून, शिंदेसेनेचा या निवडणुकीत कस लागण्याची चिन्हे आहेत.
सदा सरवणकर यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचे पुत्र समाधान आणि कन्या प्रिया सरवणकर यांना पालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल.
उद्धवसेनेकडून माजी महापौर मिलिंद वैद्य व इतर ज्येष्ठ शिवसैनिक रिंगणात उतरण्याची शक्यता असताना शिंदेसेनेचे नवखे उमेदवार त्यांच्यासमोर किती तग धरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर बदलेलेल्या समीकरणांमुळे दादर-माहीम भागातील लढती रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.