Join us  

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण आपघात; एक ठार, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:14 AM

या आपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमीं पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई- मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाराजवळ मंगळवारी  रात्री 12 वाजताच्या सुमारास क्रूझर गाडीला आपघात झाला. या आपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमीं पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

कल्याण हुन चाळीसगावकडे जाणारी क्रूझर (गाडी क्रमांक- MH20CH5513) ही भरधाव वेगात नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी, कसारा बायपास जवळील आडमाळ गावालागत असलेल्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यालगत 20 मीटर अंतरावर असलेल्या एका महाकाय दगडावर जाऊन आधळली. या भीषण अपघातात राजेंद्र नामदेव पवार (वय 45, रा. खडकपाडा, कल्याण.) हे  जागीच ठार झाले.

आपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. ए. नाईक, पोलीस कर्मचारी रामदास राठोड, अशोक इखणकर, अनिल निवळे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्य सुरू केले. पाऊस व अंधार असल्याने क्रूझर गाडीत अडकलेल्याना बाहेर काढण्यात व्यत्यय येत होता, तरी अथक प्रयत्न करून 14 मिनिटांत पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी अडकलेल्याना बाहेर काढले. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर संदीप पंडित परदेशी (रा, डोंबिवली) यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले. याशिवाय, भारती शंकर परदेशी यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी आहेत, राजेंद्र तुकाराम गढरी, चालक (रा. बदरके, जळगाव), विशाल नामदेव गढरी, तुषार दिपक परदेशीं, शकुंतला नामदेव गढरी, हर्षल मधुकर गढरी, श्रेयस अरुण गढरी, भावेश अरुण गढरी आणि सनी महादू गढरी (सर्व रा कल्याण) हे जखमी झाले आहेत. जखमींना एका खासगी पिकअप गाडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यांपैकी संदीप परदेशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कल्याण येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी कसारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता -पुढे वळणावर आपघात झाला असल्याची माहिती एका कार चालकाने महामार्गावर शिरोळ जवळ असलेल्या पोलीस चेकपोस्टला दिली. यानंतर ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी रामदास राठोड यांनी भर पावसात दुचाकीवर घटनास्थळी धाव घेतली व वरिष्ठाना व आपत्ती व्यवस्थापन टीमला कळवले. यानंतर पोलीस अधिकारी व आपत्ती टीम सदस्य घटनास्थळी पोहोचले  व मदत कार्य सुरू केले. राठोड यांच्या या तत्परतेमुळे आपघातग्रस्ता ना तात्काळ मदत मिळाली.

पावसाची रीप-रीप अन् अंधारामुळे मदत कार्यास अडथळे -मंगळवारी रात्री पावसाची रीप-रीप मोठ्या प्रमाणावर सुरू होती. आपघात ठिकाणी अंधार होता. त्यामुळे पोलीस व मदतीला आलेल्या टीमला मदत कार्यात व्यत्यय येत होता. गाड्यांच्या लाईंट्स व बॅटरीच्या सहाय्याने मदत कार्य सुरु होते. 

टॅग्स :अपघातमुंबईपोलिसहॉस्पिटल