Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएनजीसाठीच्या अटी, शर्ती शिथिल : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 08:57 IST

सिलिंडर गॅसचा पुरवठा सुरळीत, टाळेबंदीची अफवा

मुंबई: शहरी भागातील एलपीजी पुरवठ्याचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात पाइप गॅस पुरवठ्याच्या अटी, शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पश्चिम आशियाई देशातील युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भात फडणवीस यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यात पेट्रोल, डिझेल तसेच सिलिंडर गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला.

पीएनजी साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या या तातडीने देण्यासंदर्भात सूचना देण्यात आले आहेत. पाइप गॅसमुळे शहरांचा भार कमी केला तर भविष्यात अडचण येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, की आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही लोक जाणीवपूर्वक देशात टाळेबंदी लागेल, असा संभ्रम पसरवत आहेत. टाळेबंदी पसरवणारे लोक अक्षरशः देशद्रोह करत आहेत. टाळेबंदीबाबत खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान, महाराष्ट्रात पाईपद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने तांत्रिक सहाय्य आणि पायाभूत सुविधांसाठी विशेष आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिल्लीत केली.

सर्व मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतुक

देशात एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकू नयेत, यासाठी केंद्र सरकारने जे निर्णय घेतले त्याबद्दल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता आखाती युद्धामुळे त्यांच्यावर काही ना काही परिणाम झाला आहे. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत ते पाहता आपले दैनंदिन जीवन कमीत कमी प्रभावित झाले, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : PNG Norms Eased: Chief Minister Announces Policy Shift

Web Summary : Maharashtra eases PNG norms to reduce LPG burden amid global concerns. CM assures stable fuel supply, warns against lockdown rumors. State seeks central funds for gas pipeline expansion. Other CMs praised Modi's efforts.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईदेवेंद्र फडणवीस