Join us  

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 1:30 AM

मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचे कोणी समजू नये - उद्धव ठाकरे

मुंबई : ज्यांच्या मधूर संबंधांमुळे युती टिकून असल्याचे बोलले जाते ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे चित्र असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे युतीच्या चर्चेत खोडा घातला गेला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. ‘मुख्यमंत्री पदाचा अमरपट्टा घातल्याचे कोणी समजू नये’ असा इशाराही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर सत्तेबाबतच्या चर्चेला खीळ बसली आहे.

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचे काहीही ठरलेले नव्हते, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केले होते. शिवसेना आमदारांच्या गुरुवारच्या बैठकीत उद्धव यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी तसे बोलायला नको होते. त्यांच्या विधानाने चर्चेला खीळ बसल्याचे उद्धव म्हणाले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चेत जे ठरलंय त्यानुसार व्हायला हवे. सगळे काही सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.

युतीच्या सत्तावाटपाची चर्चा मंगळवारी होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेनेने ती बैठकच रद्द केली. तेव्हापासून काल आणि आजही दोन्ही पक्षांमध्ये चर्चाच होऊ शकलेली नाही. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी, युती करण्यातच भाजप, शिवसेना व राज्याचेही भले असल्याचे विधान करून मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेचा सूर नरमाईचा झाल्याचे संकेत दिले होते. तथापि, त्यानंतर काहीच तासात पुन्हा आक्रमक होत शिवसेनेने भाजपवर दबाव वाढविला आहे.

राऊत यांचा पलटवारबुधवारी मुख्यमंत्री पदाबाबत नरमाईचा सूर लावणारे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पलटवार केला. ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला ठरलेला होता. त्यात मुख्यमंत्रिपददेखील येते. मुख्यमंत्रिपद सत्तेचाच भाग आहे, ते काही एनजीओचे पद नाही, असा टोला त्यांनी हाणला.भाजप मात्र ठामगृह, वित्त, नगरविकास वा महसूल यापैकी कोणतेही खाते शिवसेनेला देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेना मात्र त्यापैकी दोन खात्यांबद्दल आग्रही आहे. या बाबत एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत भाजपला कळविण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेभाजपाशिवसेना