Join us  

...आणि ठक्कर बाप्पा कॉलनीत तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:31 AM

मुलीचा शोध लागत नसल्याने रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याचा आरोप रेगर समाजाकडून करण्यात आला.

मुंबई : मुलीचा शोध लागत नसल्याने रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याचा आरोप रेगर समाजाकडून करण्यात आला. तेव्हापासून गेले आठ दिवस चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत तणावाचे वातावरण आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा येथील रेगर समाजाने घेतला होता. पोलिसांनी वेळोवेळी त्यांची समजूत काढली.

पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर मंगळवारी सकाळी रिठाडिया यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. अंत्ययात्रेसाठी सुमारे पाच-सहा हजार जणांची गर्दी मंगळवारी कॉलनीत जमा झाली होती. अंत्ययात्रा कुर्ला सिग्नल येथे पोहोचताच नागरिकांनी पूर्व द्रुतगती मार्ग रोखून धरला. यानंतर काही आंदोलक सायन-पनवेल महामार्गाच्या दिशेने रवाना झाले व त्यांनी सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला.

सर्व आंदोलक सायन-पनवेल महामार्गावरील छगन मीठा पेट्रोल पंप येथे जमताच त्यांनी तेथे ठिय्या दिला. या नंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलीस आंदोलकांची समजूत काढत होते. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी पोलिसांविरोधात असभ्य शब्दात घोषणाबाजी सुरू केली. यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून त्यांची नासधूस केली.

काही पोलिसांना जमावाने घेरून लाथा बुक्क्यांनी व लोखंडी वस्तूने मारहाण केली. जखमी पोलिसांना त्वरित रुग्णवाहिकेतून ने रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे असे लक्षात येताच पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. रस्त्यात पोलिसांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी स्मशानभूमीजवळून जमावाला पांगवल्यानंतर जमाव चरई तलावाजवळ जमा झाला आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांच्या सुटकेची मागणी करू लागले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांततेत घरी जाण्याची विनंती केली. या संपूर्ण घटनेमुळे कुर्ला पूर्व आणि चेंबुर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. छगन मीठा पेट्रोल पंप येथील बस स्थानक, पदपथावरील शोभेच्या झाडेदेखील तोडण्यात आली.

३ पोलीस जखमी

चेंबूर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण तेजळे यांच्यासह ३ पोलीस जखमी झाले आहेत. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चिठ्ठ्यांमागील गूढ

१३ आॅक्टोबर रोजी पंचाराम रिठाडीया यांचा मृतदेह टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरात आढळला. मुलीचा शोध न लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. पुढे हे प्रकरण वडाळा पोलिसांकडून तपासासाठी नेहरूनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. मृतदेहाजवळ काही चिठ्ठ्यादेखील पोलिसांना सापडल्या. मात्र या चिठ्ठ्यांमधील मजकूर वादग्रस्त असल्याचे समजते. रिठाडिया हे अशिक्षित होते. मग या चिठ्ठ्या कोणी लिहिल्या? मृतदेह मिळण्यापूर्वीच नातेवाइकांच्या व्हॉट्सअ‍ॅपसह सोशल मीडियावर त्या व्हायरल झाल्याची माहिती तपासात समोर येत आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या? यामागे कुठले राजकीय षड्यंत्र होते का? या दिशेनेही तपास सुरू आहे.

टॅग्स :पोलिसमृत्यू