Join us

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 06:50 IST

आमदार विलास पोतनीस, हेमंत टकले यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबई : मुंबईतल्या दादर येथील महापौर निवासाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी प्राप्त झालेल्या दोन निविदांपैकी लघुत्तम निविदा ५४.५० टक्के अधिक दराची असल्याने ती नाकारण्यात आल्याची लेखी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

विलास पोतनीस, हेमंत टकले यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर निविदा रद्द करण्यात आल्यानंतर, बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. या स्मारकासाठी लागणारा १०० कोटींचा खर्च सुरुवातीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने खर्च करायचा आहे. राज्य सरकार त्याची प्रतिपूर्ती करणार असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अन्यत्र हलविण्याचा सरकारचा कोणताच विचार नाही. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट इमारतीसमोरील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिल्याचे शिंदे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरे