तिसऱ्या मुंबईच्या मास्टर प्लॅनच्या निविदा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:19 IST2025-01-21T11:19:20+5:302025-01-21T11:19:20+5:30
Mumbai News: अटल सेतू प्रभावित उरण, पेण पनवेल तालुक्यातील १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी करण्यासाठी या भागाचा मास्टर प्लॅन बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागविलेल्या निविदा रद्द केल्या.

तिसऱ्या मुंबईच्या मास्टर प्लॅनच्या निविदा रद्द
मुंबई - अटल सेतू प्रभावित उरण, पेण पनवेल तालुक्यातील १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी करण्यासाठी या भागाचा मास्टर प्लॅन बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागविलेल्या निविदा रद्द केल्या. या निविदेत काही त्रुटी असल्याने त्या रद्द केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएची नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील ३२३.४४ चौरस किमी क्षेत्रातील गावांचा विकास साधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक सुविधांचे नवे शहर वसविले जाणार आहे. हे नवनगर ३२ हजार ३०० हेक्टर क्षेत्रफळावर उभे राहणार आहे.
भूवापर नकाशा तयार करण्याचे काम होणार
या नवनगरांसाठी व्हिजन डॉक्युमेंट, सर्वसमावेशक मास्टर प्लॅन, नियोजन प्रस्ताव आणि सविस्तर विकास धोरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमणुकीसाठी एमएमआरडीएने १५ जानेवारीला निविदा काढल्या होत्या.
एमएमआरडीएने आठवडाभराच्या आतमध्ये या निविदा रद्द केल्या आहेत. प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
भूवापर नकाशा तयार करण्यासाठी काढलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या नाहीत. मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी काढलेल्या निविदा रद्द केल्या असल्या तरी भूवापर नकाशा तयार करण्याचे काम केले जाईल.