Join us  

मुंबई परिसरातील विविध घटनांत १० जण बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 7:04 AM

धुळवड साजरी करताना विविध चार घटनांमध्ये गुरुवारी दहा जण बुडाले. पालघरजवळच्या कळंब येथील समुद्रकिनारी ५, उल्हास नदीवर दोघे, पनवेलमध्ये एक आणि बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन जण बुडाले.

नालासोपारा - धुळवड साजरी करताना विविध चार घटनांमध्ये गुरुवारी दहा जण बुडाले. पालघरजवळच्या कळंब येथील समुद्रकिनारी ५, उल्हास नदीवर दोघे, पनवेलमध्ये एक आणि बदलापूरच्या बॅरेज धरणात दोन जण बुडाले.पालघरजवळच्या कळंब येथील समुद्रकिनारी गुरुवारी धुळवडीसाठी आलेल्या पर्यटकांपैकी अंबाडी परिसरातील पाच पर्यटक बुडाले. यामध्ये चार महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. त्यातील तरुणाचा मृतदेह सायंकाळी उशिरा सापडला. वसईच्या अंबाडी मानवमंदिर कॉम्प्लेक्समधील तीन कुटुंबांतील लोक दुपारी दोनच्या सुमारास कळंब समुद्रकिनारी आले होते. मोर्या परिवारातील आई, मुलगा व मुलगी आणि गुप्ता परिवारातील दोन्ही सख्ख्या भावांच्या पत्नी असे एकूण ५ जण बुडाले. शीतल गुप्ता (३२), निशा मोर्या (४०), कंचन गुप्ता (३५), प्रिया मोर्या (१८) आणि प्रशांत मोर्या (२०) अशी बुडालेल्यांची नावे असून प्रशांत याचा मृतदेह सापडला.अग्निशमन दल, अर्नाळा पोलीस, मच्छीमारांची तीन पथके, मनपाची जीवरक्षकांची टीम आणि सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी खोल समुद्रात जाऊन शोधकार्य करीत आहेत. रात्री उशिपर्यंत चौघांचा शोध लागला नव्हता. दुसऱ्या घटनेत उल्हास नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बुडालेला एक जण घाटकोपर येथील आहे. पाषाणे येथे राहणारे शामनाथ सिंग यांच्याकडे त्यांचे नातेवाईक मुंबई घाटकोपर येथून होळीसाठी आले होते. दुपारी ते उल्हास नदीवर पोहोचले. त्या वेळी विनय सिंग आणि देवेंद्र सिंग हे नदीमध्ये खोल पाण्यात गेले. ते बराच वेळ बाहेर येत नसल्याने मदतीसाठी पोलीस आणि अग्निशमन दलाला बोलावले गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.तिसऱ्या घटनेत धूळवड खेळून झाल्यावर बॅरेज धरणात गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत होते.बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे तरुण धूळवड खेळून झाल्यावर पोहण्यासाठी बॅरेज धरणात उतरले होते. त्यांच्यापैकी कल्पेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत बुडाला. त्याचा मित्र कार्तिक लाडी हा तरुण पुढे आला. मात्र, त्याचाही तोल गेल्याने तोही पाण्यात बुडाला. याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने त्यांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती.चौथ्या घटनेत मित्रांबरोबर तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल आय.टी.आय. कॉलेजमध्ये शिकत असलेला धीरज चंद्रकांत खताते (२१, रा. कामोठे) हा आपल्या मित्रांबरोबर देवळोली तलाव येथे पोहण्यास गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे. 

टॅग्स :मृत्यूअपघात