Ten crore from the municipality for the 'Best' colonies, the cost of repairing the houses | ‘बेस्ट’ वसाहतींसाठी पालिकेकडून दहा कोटी, निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी होणार खर्च
‘बेस्ट’ वसाहतींसाठी पालिकेकडून दहा कोटी, निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी होणार खर्च

मुंबई : बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी धाऊन आलेल्या महापालिकेने आणखी १० कोटींचे अनुदान देण्याची तयारी दाखविली आहे. बेस्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने वसाहतींच्या दुरुस्तीवर केलेल्या खर्चाची देयके सादर केल्यास टप्प्याटप्प्याने महापालिका ही रक्कम अदा करणार आहे.
बेस्ट उपक्रमाला सुमारे १२०० कोटींचे बिनव्याजी कर्ज, ६०० कोटींचे अनुदान महापालिकेने गेल्या वर्षभरात दिले आहे. त्याचबरोबर बेस्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वसाहतींच्या दुरुस्तीसाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात १० कोटींची तरतूद यासाठी केलेली आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने वसाहतींची दुरुस्ती केल्यानंतर त्यावर आलेला खर्च पालिका देत असते.
याआधी महापालिकेने सन २०१८-१९ मध्ये मोडकळीस आलेल्या वसाहतींच्या दुरुस्तीवर एक कोटी नऊ लाख एक हजार ९४८ रुपये खर्च केले होते. ही रक्कम खर्च केल्याचे सर्व कागदपत्रे, देयके दिल्यानंतर महापालिकेने त्याचे अधिदान केले होते. तर एप्रिल २०१९ पर्यंत एक कोटी ८६ हजार रुपयांचे अधिदान करण्यात आले आहे.


Web Title:  Ten crore from the municipality for the 'Best' colonies, the cost of repairing the houses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.