पारा झेपावतोय चाळिशीकडे
By सचिन लुंगसे | Updated: March 21, 2024 19:40 IST2024-03-21T19:39:51+5:302024-03-21T19:40:05+5:30
कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट स्थिती राहील.

पारा झेपावतोय चाळिशीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एप्रिल, मे महिना उंबरठ्यावर असताना मुंबई मार्च महिन्यातच तापू लागली आहे. कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा गाठला असून, उष्ण आणि दमट हवामानामुळे मुंबईचे कमाल तापमान ३९ अंश नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामान राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९, २२ अंशाच्या आसपास राहील. दरम्यान, राज्यातही हवामान कोरडे राहील. पुढील ४ ते ५ दिवस राज्याच्या अंतर्गत भागांत कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल. कोकण आणि गोव्याच्या काही भागात उष्ण आणि दमट स्थिती राहील.
अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान स्थिर (सेट) होतात. समुद्री वारे दुपारी स्थिर झाले तर तापतात. आता नेमके हीच परिस्थिती असून, समुद्री वारे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होत आहे. या गरम वाऱ्यामुळे तापमान अधिक नोंदविले जात आहे.
रात्रीचे तापमान २४ अंशाच्या आसपास नोंदविले जात आहे. २१ मार्चच्या रात्री २४ अंशाची नोंद झाली असून, दिवसही ३८ अंशावर येऊन ठेपला आहे.