तेलगू अभिनेत्रीची अडीच लाखांची फसवणूक; चित्रपट निर्मात्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:52 IST2026-01-13T11:52:36+5:302026-01-13T11:52:36+5:30
अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने पोलिसांत तक्रार केली

तेलगू अभिनेत्रीची अडीच लाखांची फसवणूक; चित्रपट निर्मात्यावर गुन्हा
मुंबई : तेलगू चित्रपटसृष्टीतील निर्मात्याने मानधनाचा दिलेला अडीच लाखांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
दिगांगना हिने निर्माता सुरेश पाटील यांच्या 'वाइल्ड' या तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. सुरुवातीला शूटिंग सुरेश पाटील यांच्या 'हॉर्नबिल' या संस्थेमार्फत सुरू झाले. दिगांगना हिला १९ लाखांचे ठरले. त्यापैकी ५ लाख देण्यात आले. नंतर हा चित्रपट 'पिपल्स मीडिया'कडे हस्तांतरित केला. २४ सप्टेंबर २०२२ रोजी ई-मेलद्वारे डिजिटल करार करण्यात आला. तिला टप्प्याटप्प्याने १४ लाख देण्याचे ठरले.
तीन वर्षे चित्रपटाचे चित्रीकरण
सन २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, त्या कालावधीत अभिनेत्रीच्या एचडीएफसी बँक खात्यावर एकूण ११ लाख रुपये जमा करण्यात आले. दरम्यान, चित्रपट पुन्हा पाटील यांच्या 'हॉर्नबिल' कंपनीकडे देण्यात आला. अंतिम चित्रीकरणासाठी सुरेश पाटील यांनी अभिनेत्रीला ई-मेलद्वारे २.५ लाख रुपयांचा पोस्टडेटेड धनादेश देण्याचे आश्वासन दिले.
स्वाक्षरी जुळत नसल्यामुळे...
८ जुलै २०२५ रोजी तिच्या निवासस्थानी १० सप्टेंबर २०२५ तारखेचा अडीच लाख रुपयांचा चेक पाठवण्यात आला. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दिगांगना हिने बँकेत चेक जमा केला. मात्र, स्वाक्षरी जुळत नसल्यामुळे चेक बाउन्स झाला. तिने निर्माता सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार केली.