Join us

अंधेरीत जलवाहिनी दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; लाखो नागरिकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 11:20 IST

आणखी काही तास पाणीपुरवठा विस्कळीत.

मुंबई : मेट्रो प्रकल्पाचे खोदकाम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील मुख्य जलवाहिनी गुरुवारी फुटली. ती दुरुस्त करण्याचे काम  शनिवारी सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. 

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा दाब तयार झाल्यावर पश्चिम उपनगरात वांद्रे ते अंधेरी, जोगेश्वरी आणि पूर्व उपनगरात कुर्ला विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वेरावली जलाशयाच्या १८०० मिमी व्यासाच्या एक इनलेट मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ येथे धक्का लागला व गळती सुरू झाली. 

 या जलवाहिनी दुरुस्तीचे मोठे काम शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हाती घेण्यात आले.

 काम रविवारी सकाळी पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, या दुरुस्ती कामास तांत्रिक आव्हानामुळे अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.

 नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून, त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागत आहे. 

टॅग्स :मुंबईपाणी टंचाईअंधेरी