मुंबई : शाळांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन व दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने ७ ऑगस्टला बदलून गौरी-गणपती व नारळीपौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे.
मुंबईत गणपती विसर्जन आणि दहीहंडी या सार्वजनिक सणांच्या दिवशी शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड गर्दी व वाहतूककोंडी होते. गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरतात. त्यावेळी वाहनांचे मार्ग बदलले जातात, तसेच विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अपघाताचा धोका संभवतो. या दिवशी सुट्टी न दिल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची राहील, असे शिक्षिका रेखा बोंडे यांनी सांगितले.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनीही, गणपती विसर्जन व दहीहंडी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी शाळा सुरू ठेवल्यास एखादा विद्यार्थी गर्दीत हरवला, तर जबाबदारी शासन घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
माझी मुलगी चौथीत शिकते. पारंपरिक सणांच्या दिवशी मुलांना विशेष उत्साह असतो. प्रचंड गर्दीत मुले शाळेला कशी जाणार? सरकारने सुट्टी बदलून चूक केली आहे - अन्नपूर्णा कलशेट्टी, पालक
पूर्वापार चालत आलेल्या या सुट्ट्या का रद्द केल्या, याचे स्पष्ट कारण मिळालेले नाही. शासनाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही - सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती