Join us

मुंबईतील आझाद मैदानात बालदिनी शिक्षणविरोधी धोरणांविरोधात शिक्षकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:30 IST

राज्यात सुरू असलेल्या शिक्षण विरोधी धोरणाविरोधात बालदिनाचे निमित्त साधत मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून आझाद मैदानात निषेध आंदोलन केले.

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या शिक्षण विरोधी धोरणाविरोधात बालदिनाचे निमित्त साधत मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून आझाद मैदानात निषेध आंदोलन केले. महिनाअखेरपर्यंत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर राज्यातील प्रत्येक विभागात इशारा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल. मंगळवारी ( 14 नोव्हेंबर ) सकाळपासून शिक्षक आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत या आमदारांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे.

दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणेच शालेय शिक्षकही आझाद मैदानात बालदिनानिमित्त बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. घोषित शाळांना तत्काळ अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी आंदोलनकर्त्या महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी आहे.

टॅग्स :बालदिनशिक्षक