Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांचा विनातिकीट दंड भरून रेल्वे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:36 IST

प्रशासनाने प्रवासाची परवानगी नाकारल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीचा निकाल लावताना अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळांमध्ये शिक्षकांना साेमवारपासून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने तसेच तिकीट नाकारण्यात आल्याने अनेक शिक्षकांनी घरचा रस्ता धरला. अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ८०० ते १००० रुपये खर्च करून खासगी वाहनांनी शाळा गाठली, तर अनेकांनी दंड भरून रेल्वेने प्रवास केला.दहावी निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक संघटना विनंती करत आहेत. मुंबई आणि ठाणे विभागातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे उपनगरातून ठाणे, वसई - विरार, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, कर्जत, कसारा, पालघर येथून प्रवास करतात. विद्यार्थीहित लक्षात घेऊन निकालाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक संघटना १५ दिवसांपासून विनंती करत आहेत. अद्याप परवानगी मिळालेली नाही. अखेर साेमवारी शिक्षकांवर दंड भरून रेल्वेचा प्रवास करण्याची वेळ ओढवली. याचे सेल्फी व्हायरल करून हाेणाऱ्या त्रासाची त्यांनी प्रशासनाला जाणीव करून दिली.शासनाने रेल्वे प्रवासाची परवानगी शिक्षकांना न दिल्यास दहावीच्या निकालावर याचा परिणाम होऊ शकतो. हा निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशा प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत. दरम्यान, आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून परवानगीचे पत्र निघेल, असेही आश्वासन दिले. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी ही माहिती दिली.

फाइल किती वेळ अडवून ठेवणार?शिक्षक परिषदेकडून ही परवानगी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, शिक्षक व शिक्षकेतरांना रेल्वे प्रवासाच्या परवानगीसाठीची फाईल शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग मान्यतेसाठी ही फाइल किती वेळ अडवून ठेवणार, याची वाट पहावी लागेल.- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

प्रवासासाठी लागला सुमारे आठ तासांचा वेळअनेक महिला शिक्षक कल्याण, पालघर, पनवेल परिसरातून शाळेत येण्यासाठी बसने निघाल्यापासून शाळेत पोहोचेपर्यंत तीन ते चार तास लागले. पुन्हा जाण्यासाठीही अशीच कसरत करावी लागल्याने प्रवासातच आठ ते दहा तास गेले. त्यामुळे शिक्षकांना प्रचंड त्रास होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :शिक्षक