Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना करावी लागली काॅपी, विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रश्नपत्रिका अपुऱ्या, ‘पॅट’च्या गोंधळात आणखी भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:12 IST

Exam News: संकलित मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) परीक्षेकरिता मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये  अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. आधी विद्यार्थी आणि प्रश्नपत्रिकांमधील तफावत भरून काढण्याकरिता फोटोकॉपी काढू नका असे शाळांना सांगितले.  

मुंबई - संकलित मूल्यमापन चाचणी-२ (पॅट) परीक्षेकरिता मुंबईसह राज्यातील अनेक शाळांमध्ये  अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. आधी विद्यार्थी आणि प्रश्नपत्रिकांमधील तफावत भरून काढण्याकरिता फोटोकॉपी काढू नका असे शाळांना सांगितले.  नंतर बुधवारी फोटोकॉपीस परवानगी दिली. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी अनेक शाळांची फोटोकॉपी काढताना तारांबळ उडाली होती.

राज्यातील तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ४ ते ६ एप्रिलदरम्यान सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या विषयांच्या पॅटचे आयोजन केले आहे. परीक्षेच्या प्रश्नत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाठविण्यात येतात. आधी परीक्षा कशी घ्यायची याबाबत सातत्याने गोंधळ घालण्यात आला. त्यात काही दिवसांपूर्वी पॅटची इयत्ता आठवीची तीन विषयांची उत्तरसूची समाज माध्यमांवर आढळली.  

सर्वच विषयांबाबत अनेक शाळांमध्ये घडला प्रकारएका शाळेत गणित विषयाकरिता पाचवीच्या ५५, सहावीसाठी ७८, सातवीसाठी ७५ आणि आठवीसाठी १०० प्रश्नपत्रिकांची मागणी कऱण्यात आली होती. प्रत्यक्षात अनुक्रमे ५, ४, ५ आणि २० प्रश्नपत्रिका पाठवल्या आहेत. कमी अधिक फरकाने हा प्रकार सर्वच विषयांबाबत अनेक शाळांमध्ये आहे.

नियोजन झाल्याखेरीज परीक्षा घेऊ नयेराज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करताना त्याची योग्य सांख्यिकी माहिती घेऊन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. वितरण व्यवस्थेतही दोष आहे. आयत्यावेळी प्रश्नपत्रिका कमी पडल्यास फोटोकॉपी काढणे अत्यंत अडचणीचे होते. त्यामुळे परिपूर्ण नियोजन झाल्याखेरीज परीक्षांचे आयोजनच करू नये, अशी भूमिका शाळा मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. 

गेल्या वर्षीही प्रश्नपत्रिका कमी पडल्या होत्या. त्याचा आढावा घेऊन यंदा पुरेशी छपाई आणि पुरवठा आवश्यक होता. गेल्या वर्षी शाळांना फोटोकॉपीच्या खर्चाची बिले पाठविण्यास सांगण्यात आले होते, मात्र ही बिले अद्याप मिळालेली नाहीत.- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ 

झेरॉक्स काढण्याची मुख्याध्यापकांवर वेळशिरगाव (जि. पुणे) : नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा शासनाकडून अपुरा झाल्यामुळे शाळा प्रशासनाला प्रश्नपत्रिका बाहेरून झेरॉक्स कराव्या लागत आहेत. या झेरॉक्सचा खर्च कोठून करायचा, अशा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन २ ही परीक्षा गुरुवारपासून राज्यभर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी सर्व जिल्हा परिषद व खासगी अनुदानाची शाळांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या आहेत.   परंतु बऱ्याच जिल्हा परिषद शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये या प्रश्नपत्रिकेचा अपुरा पुरवठा झाला आहे.  शाळांकडून प्रश्नपत्रिकांची मागणी शासनाकडे केल्यास प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते. 

टॅग्स :शिक्षणपरीक्षा