Join us  

शिक्षकांना लोकलप्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या मागणीवर रेल्वेची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 8:01 PM

Local Train : हळूहळू रेल्वेने आणि राज्यसरकारने वकील, महिला, पत्रकारांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सुरु करण्य़ाची मागणी राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहता यावे यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. यावर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने हे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

यानुसार शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. यानंतर पास, तिकिट देण्य़ात येणार असून ते लोकल प्रवास करू शकणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीशिवाय अन्य लोकांनी लोकल प्रवासासाठी गर्दी करू नये असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.

हळूहळू रेल्वेने आणि राज्यसरकारने वकील, महिला, पत्रकारांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सुरु करण्य़ाची मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र, गर्दी रोखणार कोण? त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्य़ाचे रेल्वेने सांगितल्याने यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. 

 

शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसाय हाेऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली होती. 

टॅग्स :लोकलशिक्षक