चर्चगेट स्थानकावर स्वत:च्या बँक खात्यावर दंडाची रक्कम घेणारा टीसी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:20 IST2026-01-20T12:19:45+5:302026-01-20T12:20:38+5:30
असे प्रकार पुन:पुन्हा घडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे

चर्चगेट स्थानकावर स्वत:च्या बँक खात्यावर दंडाची रक्कम घेणारा टीसी निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर सोमवारी तिकीट तपासणीदरम्यान गैरप्रकार उघडकीस आला. प्रवाशांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम स्वत:च्या बॅंक खात्यात वळविणाऱ्या टीसीला निलंबित करण्यात आले आहे. निलंबित टीसीचे नाव जसबीर सिंह नोत्रा असे असून, त्याने दंडाची रक्कम घेतली मात्र, प्रवाशाला पावती दिली नाही. ही बाब ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्याची दखल घेत चाैकशीअंती संबंधित टीसीवर निलंबनाची तत्काळ
कारवाई केली.
प्रवाशांची सर्रास लूट
मार्च आणि ऑगस्ट २०२५ मध्येही असे प्रकार ‘लोकमत’ने उघड केले होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने असे प्रकार पुन:पुन्हा घडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, प्रवाशांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशालने पकडले, दंड जसबीरने घेतला
चर्चगेट स्थानकावर टीसी विशाल यांनी चार प्रवाशांची तिकीट तपासणी केली. त्यांचे केवळ मरीन लाइन्सपर्यंत तिकीट असल्याने दंड भरण्यास सांगितले. दोन प्रवाशांकडून प्रत्येकी २५५ प्रमाणे ५१० रुपयांचा दंड घेण्याचे ठरले. दरम्यान, टीसी जसबीर सिंह तेथे आले. त्यांनी चौघांकडून १,०२० रुपये दंड घेण्यास सांगितले हाेते. जसबीर यांनी केवळ तिघांनीच पैसे भरा आणि निघून जा, असे सांगितले.
माझ्या अधिकृत डिव्हाइसची चार्जिंग संपल्याने तो चार्जिंगला लावला होता. त्यामुळे वैयक्तिक अकाउंटवर पैसे घेतले.
-जसबीर सिंह नोत्रा, टीसी
संबंधित तिकीट तपासणीसाला निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
दंडाची रक्कम वैयक्तिक खात्यावर
- एका प्रवाशाने जसबीर यांच्या वैयक्तिक यूपीआय खात्यावर ७४० रुपये पाठवले, तर उर्वरित रक्कम रोख स्वरूपात दिली. मात्र, दंडाची कोणतीही पावती त्याला दिली गेली नाही. घटनास्थळी उपस्थित ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने प्रवाशांकडे पावतीबाबत चौकशी केली असता, पावती दिली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
- टीसी विशाल यांच्याकडे विचारणा केली असता, जसबीर यांनी पैसे घेतले आहेत, मग पावती घ्यायला त्यांच्यामागे का गेला नाहीत?, असा उलट सवाल प्रवाशांनाच केला. दरम्यानच्या काळात त्या प्रवाशांना ७८० रुपयांची पावती दिल्याचे जसबीर यांनी कळवले.
- अधिकृत यूपीआय खाते कार्यरत आहे. दंडाची रक्कम त्यावर घेण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. असे असतानाही टीसी वैयक्तिक खात्यांवर पैसे घेऊन पावती देत नसल्याने रेल्वेच्या महसुलाला फटका बसत आहे.