करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:50 IST2025-01-14T11:50:39+5:302025-01-14T11:50:53+5:30
पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

करदात्यांना भरावा लागणार २ टक्के दंड, विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू
मुंबई : एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात पालिकेकडून पाच हजार ९९२ कोटी इतक्या मालमत्ता कराचे संकलन करण्यात आले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना २ टक्के दंड भरावा लागणार आहे.
पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. त्यादृष्टीने मालमत्ताधारकांनी मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन यापूर्वी वेळोवेळी करण्यात आले.
आता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर आधी जप्ती आणि मग त्याचा लिलाव करण्यात येणार आहे.