८.५५ कोटींचा कर थकवला; मालमत्तांचा लवकरच लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:33 IST2025-10-09T10:33:27+5:302025-10-09T10:33:42+5:30
पालिकेने महिनाभरापूर्वी पाच थकबाकीदारांना मालमत्तांच्या लिलावाची नोटीस बजावली. मुदतीत केवळ एकाच संस्थेने मालमत्ता कर भरला.

८.५५ कोटींचा कर थकवला; मालमत्तांचा लवकरच लिलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जवळपास आठ कोटी ५५ लाखांहून अधिक रकमेचा मालमत्ता कर थकविल्याने चार संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच जाहिरात काढून मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. त्याकरिता कर निर्धारण व संकलन विभागाकडून पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात ७ हजार ७०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत तीन हजार १०० कोटींचे (४२ टक्के) उद्दिष्ट पालिकेने गाठले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी वर्षानुवर्षे कर थकविणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
पालिकेने महिनाभरापूर्वी पाच थकबाकीदारांना मालमत्तांच्या लिलावाची नोटीस बजावली. मुदतीत केवळ एकाच संस्थेने मालमत्ता कर भरला. मात्र, उर्वरित चार संस्थांनी कर न भरल्याने पालिकेने त्यांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.
... तर स्थगिती
या प्रक्रियेदरम्यान थकबाकीदारांनी थकबाकी भरल्यास त्यांच्या मालमत्तेचा लिलाव स्थगित केला जाईल. मालमत्तांचा लिलाव करण्यापेक्षा थकीत कर वसूल करण्यावर भर असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.