Join us  

'महाराष्ट्रात तानाजी अन् छपाक टॅक्स फ्री करा', मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 3:57 PM

अजय देवगणचा बहुचर्चित तानाजी 'द अनसंग वॉरियर' आज देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोणवर भाजपा नेते आणि समर्थकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच, दीपिकाचा 'छपाक' आज प्रदर्शित झाला आहे. तर, दुसरीकडे अजय देवगणचा तानाजी हाही चित्रपट चित्रपटगृहात झळकला झाला आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची स्पर्धा लागली आहे. हे दोन्ही चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावेत, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

अजय देवगणचा बहुचर्चित तानाजी 'द अनसंग वॉरियर' आज देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची शौर्यगाथा 70 मिमि पडद्यावर झळकली असून देशभर हा इतिहास पुन्हा सहजतेनं पोहोचणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट महाराष्ट्राची अन् मराठी योद्धयाची वीरता जगासमोर मांडत आहे. त्यामुळेच, हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा, अशी मागणी शिवप्रेमी भक्तांकडून होत आहे. त्यात, काँग्रेस युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. तसेच, छपाक हाही सिनेमा राज्यात करमुक्त करावा, असे तांबे यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्रात तानाजी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गड आला पण सिंह गेला असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांच्या मृत्युनंतर काढले होते. तर, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणत तानाजी मालुसरे आपल्या कर्तव्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठीजनांची अस्मिता या चित्रपटाबद्दल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.   

टॅग्स :उद्धव ठाकरेकाँग्रेसशिवसेनातानाजीछपाक