Join us

पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:30 IST

अशा प्रकरणांमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायद्याचा गैरवापर आहे असं हायकोर्टाने सांगितले. 

मुंबई - मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने पती-पत्नी वादात महत्त्वाचा निकाल सुनावत पती आणि सासरच्यांविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे अथवा जेवणावरून थट्टा करणे भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ अंतर्गत गंभीर क्रूरता अथवा छळ मानला जाऊ शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पती आणि त्याच्या घरच्यांना दिलासा मिळाला. 

न्या. विभा कंकनवाडी आणि संजय देशमुख यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी म्हटलं की, जेव्हा नातेसंबंध बिघडतात तेव्हा नेहमी आरोप वाढवून सांगितले जातात. जर लग्नाआधी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या, आरोप सामान्य अथवा कमी गंभीर असेल तर ४९८ अ च्या व्याख्येत ती क्रूरता मानली जाऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायद्याचा गैरवापर आहे असं त्यांनी सांगितले. 

रिपोर्टनुसार, जोडप्याचे लग्न २४ मार्च २०२२ रोजी झाले होते. महिलेचे हे दुसरे लग्न आहे. महिलेने २०१३ साली सहमतीने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. आता महिलेने दुसऱ्या पतीवर आणि सासरच्यांवर लग्नाआधी पतीच्या आजारपणाचा आणि मानसिक स्थिती लपवल्याचा आरोप केला. परंतु पोलिसांनी आरोपपत्रात दाखल लग्नाआधीच्या चॅटचा उल्लेख केला. त्या चॅटमध्ये पती आजारी आहे, त्याची औषधे सुरू आहेत हे सांगितल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लग्नाआधीच पत्नीला पतीच्या आरोग्याची माहिती दिली होती हे कोर्टाने मान्य केले. त्याशिवाय फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिवाळीत १५ लाखांची मागणी केली होती असा आरोप पत्नीने केला परंतु या आरोपावर संशय व्यक्त करत पतीजवळ आधीच त्याचा फ्लॅट असल्याचे सांगितले. कपडे आणि जेवणावरून सातत्याने पती टोमणे मारत असल्याचा आरोप पत्नीने केला होता. त्यावर कोर्टाने टिप्पणी केली आहे.

कलम ४९८अ म्हणजे काय?

आयपीसी कलम ४९८-अ हे महिलेवर तिच्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या क्रूरतेशी संबंधित आहे. हा एक दखलपात्र, अजामीनपात्र आणि अ-समर्थनीय गुन्हा आहे, म्हणजेच पोलिस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. जामीन हा अधिकार नाही आणि खटला न्यायालयाबाहेर निकाली काढता येत नाही.

टॅग्स :मुंबई हायकोर्टउच्च न्यायालयपती- जोडीदार