झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:52 IST2023-05-17T15:50:58+5:302023-05-17T15:52:24+5:30
टाटा पॉवरकडून झोपडीवासीयांना सेवा देण्यासाठी विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे.

झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मार्च २०२० मध्ये टाटा पॉवरला विजेचा कमी वापर असलेल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी योजना सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, टाटा पॉवरने अशी योजना सादर केली नाही; परंतु आता आयोगाने टाटा वीज कंपनीला जूनअखेर योजना सादर करण्याचा आदेश दिला आहे. परिणामी, आता झोपड्यांमध्ये राहणाऱ्या वीज ग्राहकांना टाटा पॉवरची जोडणी मिळणे अपेक्षित आहे.
सामान्यतः मॉल, मल्टिप्लेक्स आणि व्यावसायिक कार्यालये यांसारख्या अधिक वापराच्या ग्राहकांना शुल्क लाभाची जाणीव असते. अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांच्यादरम्यानच्या कमी दराच्या आधारे असे ग्राहक निर्णय घेतात. तथापि, झोपड्यांमधील ग्राहकांना टाटा पॉवरकडून स्वस्त वीज मिळण्याचा पर्याय असूनही त्यांच्या क्षेत्रात टाटाचे जाळे उपलब्ध नसल्यामुळे ते त्यांच्या पसंतीच्या वीज वितरक कंपनीचा उपयोग करू शकत नाहीत. टाटा पॉवरला आयोगाने दिलेल्या निर्देशामुळे झोपड्यांमध्ये राहणारे, कमी वीज वापर करणारे ग्राहक आता टाटाच्या कमी दराच्या विजेची अपेक्षा करू शकतात.
अर्जांची अपेक्षा
मुंबईतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडून विजेसाठी आता अर्जांचा ओघ अपेक्षित आहे. ०-३०० युनिटच्या वापराचे दर या ग्राहकांसाठी सर्वांत आकर्षक पर्याय आहेत.
झोपडपट्टीधारक स्वस्त विजेपासून वंचित
- टाटा पॉवरकडून झोपडीवासीयांना सेवा देण्यासाठी विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे.
- झोपडपट्टी भागात टाटा पॉवरचे जाळे नसल्याने येथील ग्राहक स्वस्त विजेपासून वंचित राहिले. संबंधित क्षेत्रातील लोकसंख्येकरिता विजेच्या गरजा पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- आतापर्यंत विजेचे जाळे नसल्यामुळे टाटा पॉवरनेही या परिसरात सेवा दिलेली नाही.