वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:39 IST2023-06-06T13:39:14+5:302023-06-06T13:39:58+5:30
टाटा पॉवरकडे याबाबत जमा असलेल्या रक्कमेचा आकडा ६७ कोटी आहे.

वीज ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम आता वीज ग्राहकांना परत मिळण्याची शक्यता आहे. टाटा पॉवरकडून या संदर्भात आयोगाकडे दाखल केलेल्या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यानंतर जुलैपासून ही कार्यवाही सुरु होईल. टाटा पॉवरकडे याबाबत जमा असलेल्या रक्कमेचा आकडा ६७ कोटी असून, वीज ग्राहकांच्या वीज बिलातूनच ही रक्कम परत केली जाणार आहे, अशी माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.
गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबई शहर आणि उपनगरात विजेचा लपंडाव सुरु आहे. ओव्हरलोड येत असल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे, असे नाही तर मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. मेट्रोची कामे सुरु आहेत. कंत्राटदारांकडून कामे करताना विजेच्या वायरला हानी होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होतो. मात्र खंडित झालेल्या वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत व्हावा म्हणून आमच्याकडून प्रयत्न केले जात आहेत, असे टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशनचे प्रमुख नीलेश काणे यांनी सांगितले. कामे करताना कंत्राटदारांनी खबदारी घ्यावी, अशा सूचना देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
टाटाची एमएमआरमध्ये पॉवर
काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेशात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत टाटा पॉवरने असा काही विचार नाही, असे म्हटले असले तरी सकारात्मकताही दर्शविली आहे.