मुंबई : मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो २ ब मार्गिकेचा पहिला टप्पा सप्टेंबरअखेर, तर दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. दरवर्षी ५० किमीची मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य एमएमआरडीएला दिले आहे. त्यातून मेट्रोचे ४०० किमीचे नेटवर्क सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
बीकेसीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमएमआरडीए आणि महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
मेट्रो २ ब मार्गाचा मंडाळे ते चेंबूर आणि मेट्रो ९ चा दहिसर ते काशीगाव हा मार्ग पहिल्या टप्प्यात सुरू केला जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच बीकेसीतील अंतर्गत कोंडी सोडविण्यास सहा ठिकाणाहून बीकेसीत ये-जा करण्यासाठी रस्त्यांची उभारणी सुरू होती. त्यातील ५ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित एक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले जाणार असून, त्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील प्रवास सुकर होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बंडल स्कायवॉक उभारले
शहरात मागील काळात स्कायवॉक उभारले ते बंडल झाले. त्यावरून कोणीच चालत नव्हते. हे स्कायवॉक काढून टाकावे लागल्याने सगळे वाया गेले. परदेशात गेल्यावर स्कायवॉक बघितल्यावर समाधान वाटते. ते स्कायवॉक इतके चांगले असतात की लोकांना त्यावरून चालावे वाटते. इकडे लोक त्यावरून चालत नाहीत. त्यांना खालूनच जावे वाटते, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
या प्रकल्पांचे लोकार्पण
मंडाळे येथे उभारलेल्या ७० कोटींच्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन. एससीएलआरवरील आशिया खंडातील १०० मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल. मालवणी येथे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी २० कोटी खर्चुन उभारलेली १५६ सदनिकांच्या इमारती. कलानगर जंक्शन येथील धारावीकडून येऊन सीलिंककडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पण.