१०० अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचे लक्ष्य : किरीट भन्साळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:16 IST2025-02-20T10:11:13+5:302025-02-20T10:16:29+5:30

या विकसित भारताच्या प्रवासात आमच्या उद्योगानेही २०४७ पर्यंत १०० अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात करण्याचे ध्येय ठेवले आहे.

Target of 100 billion US dollars in exports: Kirit Bhansali | १०० अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचे लक्ष्य : किरीट भन्साळी

१०० अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचे लक्ष्य : किरीट भन्साळी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय निश्चित केले आहे. या विकसित भारताच्या प्रवासात आमच्या उद्योगानेही २०४७ पर्यंत १०० अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात करण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी या उद्योगाला बळकट करण्यासोबतच काही अभिनव योजनाही आगामी काळात राबवणार असल्याचे मत जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेईपीसी) नवनिर्वाचित अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

भारतातील हिरे आणि दागिने उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले आणि या उद्योगाच्या विकासासाठी झटणारे किरीट भन्साळी म्हणाले की,  भारतीय जेम अँड ज्वेलरी उद्योगासाठी काही धोरणात्मक योजना आखत त्या सुरू करण्याचा मानस आहे. तसेच, काही अभिनव प्रकल्प राबवण्यासाठीही आम्ही नियोजन करत आहोत. यामध्ये नवी मुंबईतील महापे येथे २२ एकर जागेवर इंडिया ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी आमचे काम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच, जागतिक स्तरावर भारतीय दागिन्यांचा प्रसार करण्यासाठी सौदी अरेबिया सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या सौदी जेएक्स या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आम्ही सहभागी होणार आहोत. तर, आपल्या येथील लहान उद्योगांना दुबईमध्ये व्यवसाय करता यावा किंवा त्या दृष्टीने काम करता यावे, यासाठी आम्ही दुबईत आयजईएक्सचे कार्यालयही उघडले आहे. प्रत्येकाला दुबईत कार्यालय स्थापन करून व्यवसाय करता येत नाही. त्या व्यापाऱ्यांसाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांत रशिया-युक्रेन युद्धजन्य स्थितीमुळे चीन आणि अमेरिका येथील जेम अँड ज्वेलरी उद्योगाची निर्यात घटली आहे. त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही व्हिएतनाम, लॅटिन अमेरिकेतील देश आदी ठिकाणी नव्या संधी शोधून केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्या विकसित करणार आहोत.

जागतिक स्तरावर भारताचे स्थान भक्कम करणार

देशांतर्गत बाजारपेठेला आणखी बळकटी देऊन या उद्योगातील जागतिक स्तरावरील आपले स्थान भक्कम करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत.

याकरिता, क्षमता, आकारमान आणि योग्य जागा या निकषांवर १७ क्लस्टर आम्ही निर्माण करणार आहोत. निर्यात बळकट करण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने या क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार आहे.

याचसोबत, केवळ हिरेच नाहीत, तर सोने, चांदी, प्लॅटिनम, नैसर्गिक हिरे, लॅबग्रोन डायमंड अशा सर्व मौल्यवान वस्तूंची निर्यात कशी वाढेल, याकरिता माझ्या अध्यक्षपदाच्या काळात विशेष लक्ष देण्याचा माझा मानस असल्याचेदेखील भन्साळी यांनी सांगितले.

Web Title: Target of 100 billion US dollars in exports: Kirit Bhansali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.